तिरंगा – भारताचा मानबिंदू


देशात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पंतप्रधान मोदींनी प्रथेप्रमाणे भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावून देशवासियांना संदेश दिला. देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा केला जात आहे. मात्र भारताची आन, शान आणि भारताचा मानबिंदू असलेला आपला राष्ट्रध्वज – तिरंगा याच्यविषयी आपल्याला बरेचवेळा फारच कमी माहिती असते. आजच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य राखून आपल्या तिरंग्याविषयी जाणून घेणे योग्य ठरेल.

दीर्घकाळ स्वातंत्र्याचा लढा दिल्यानंतर आणि लक्षावधी हुतात्म्यांनी देशासाठी देहाची आहुती दिल्यानंतर स्वतंत्र भारतासाठी राष्ट्रध्वज ठरविला गेला तो दिवस होता २२ जुलै १९४७. मछलीपट्टणमच्या पिंगली वैकय्या यांनी हा ध्वज तयार केला मात्र प्रथम तो तीन रंगात नव्हता. राष्ट्रपिता म.गांधींनी त्यात सुचविलेल्या बदलाप्रमाणे नंतर तो तिरंगी करण्यात आला. घटना समितीच्या बैठकीत पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यासंदर्भातला ठराव मांडला होता. भगवा, पांढरा, हिरवा आणि मधोमध निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला हा ध्वज फार विचार करून बनविला गेला आहे. ध्वजाचा प्रत्येक रंग आणि अशोकचक्र ही विशिष्ठ गुणांची द्योतक आहेत.

भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा तर हिरवा समृद्धी आणि निसगाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग. मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.

देशाची अस्मिता दर्शविणारा हा राष्ट्रीय ध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा याचे नियम भारतीय घटनेने घालून दिलेले आहेत. हा ध्वज खादी, रेशमी अथवा लोकरी कापडापासून बनविला जावा तसेच त्याची लांबी रूंदी ३ : २ अशा प्रमाणात असावी. ध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा. शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा. केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळाले १५ ऑगस्ट १९४७ रोजी. मात्र स्वतंत्र भारताचा पहिला तिरंगा फडकला तो १६ ऑगस्ट रोजी. जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा प्रथम फडकला तो २९ मे १९५३ रोजी. तर १९८४ मध्ये भारतीय ध्वज अंतराळात नेला गेला तो विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या अंतराळतील स्पेस सूटबरोबर.

पहिला भारतीय ध्वज १९०४ साली बनविला गेला होता मात्र तो तिरंगा नव्हता. स्वामी विवेकानंदाच्या आयरिश शिष्या भगिनी निवेदिता यांनी हा लाल पिवळ्या रंगाचा ध्वज फडकाविला होता व नंतर तो निवेदिता ध्वज याच नावाने ओळखला जाऊ लागला. २२ ऑगस्ट १९०७ साली मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीच्या भूमीवर प्रथम भारतीय ध्वज फडकाविला मात्र हाही आत्ताचा तिरंगा नव्हता असे इतिहास सांगतो.

पंतप्रधान, राष्ट्रपती, उपपंतप्रधान, उपराष्ट्रपती यांच्या निधनानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविला जातो तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, गव्हर्नर, ले.गव्हर्नर, केंद्रीय मंत्री, सभापती, मुख्य न्यायाधीश, यांच्या निधनानंतर ते ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात त्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविला जातो. मात्र याच काळात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी असेल तर तो अर्ध्यावर उतरविला जात नाही. पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करातील शहीद अशा कांही मान्यवरांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचा देह तिरंग्यातून लपेटून नेला जातो मात्र अंत्यसंस्कारापूर्वी ध्वज अतिशय सन्मानाने काढून घेतला जातो.

आपल्या राष्ट्रध्वजाचा मान सर्व भारतीयांनी ठेवला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. राष्ट्रध्वज कधीही फाटलेला, मळलेला असू नये तसेच तो कुठेही कसाही फेकलेलाही असू नये आणि याची शिकवण बालपणापासूनच मुलांमध्ये रूजविली जाईल याची दक्षता घेतली गेली पाहिजे तरच आपली भावी पिढी राष्ट्रध्वज आणि पर्यायाने देशाची मान ताठ ठेवण्यास जागरूक राहु शकेल.

1 thought on “तिरंगा – भारताचा मानबिंदू”

Leave a Comment