मॉल, शॉपिंग सेंटर प्रवेशासाठी घातलेल्या अटीचा कडाडून विरोध


मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी असलेल्या निर्बंधांमध्ये उद्या रविवारपासून शिथिलता मिळणार आहे. खासकरून रात्री दहावाजेपर्यंत राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकान उघडे राहतील. पण एकीकडे या निर्णयाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील, तरच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मॉल, शॉपिंग सेंटरमधील दुकान मालक एकीकडे दुकान रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत तर दुसरीकडे लसीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना प्रवेश मिळणार या घालून दिलेल्या नियमाचा कडाडून विरोध करत आहेत.

ज्याप्रकारे सामान्य दुकानात नियम आहेत आणि तशाच प्रकारचे नियम मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये दुकानांनासुद्धा असावेत असे दुकान मालकांचे म्हणणे आहे. मागील दीड वर्षापासून मोबाईल शॉपिंग सेंटरमध्ये दुकान मालकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आता तो पूर्ववत होण्यासाठी पूर्वीसारखे कोणतेही नियम आमच्यावर लादू नये. शिवाय लसीकरणाची अट रद्द करून आम्हाला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी दुकान मालकांकडून केली जात आहे.