सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी 15 ऑगस्टपर्यंत नामांकन दाखल करण्याचे आवाहन


मुंबई : देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक कार्यासाठी देण्यात येणाऱ्या सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नामांकने दाखल करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थेस त्यांनी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी कोणताही भारतीय नागरिक वा भारतामधील संस्था/संघटना ऑनलाईन नामांकन करु शकतात.

पुरस्कारासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या या पोर्टलवरच आपली नामांकने दाखल करायची आहेत. या पोर्टलवर दिलेल्या विहित नमुन्यात, राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने केलेल्या विशेष कार्याची तसेच आवश्यक इतर सर्व माहितीसह नामांकन सादर करणे आवश्यक आहे. नामांकन पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट, 2021 असा आहे, असे सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.