मुंबई विद्यापीठाला ई-मेल पाठवत निकाल जाहीर करा, अन्यथा बॉम्बने उडवून देण्याची धमकी


मुंबई – मुंबई विद्यापीठाला पदवीपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी करणारे अनेक ई-मेल प्राप्त झाले असून लवकरात लवकर विद्यापीठाने निकाल जाहीर केले नाहीत, तर विद्यापीठ बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांच्या मते, त्यांना बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए), बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) आणि बॅचलर ऑफ कॉमर्स (बीकॉम) च्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास सांगणारे बॉम्ब धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.

याप्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. ज्या सिस्टमवरून हे ई-मेल पाठवण्यात आले, त्याचा आयपी एड्रेस शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने जुलै महिन्यात बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाच्या सेमिस्टरचे निकाल जाहीर केले. कोरोनामुळे परीक्षा घेण्यास आणि निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाला तुलनेने बराच वेळ लागला होता.