पुणे शहरात आढळला डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण


पुणे – एकीकडे कोरोनाचे संकट अद्यापही कायम असतानाच दूसरीकडे डेल्टा प्लसचेही रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मुंबईत डेल्टा प्लसमुळे एका महिलेच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आता पुण्यातही डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आहे. पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळला असून जिल्ह्यातील एकूण संख्या सहा आहे. राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिअंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत ६६ डेल्टा प्लस व्हेरीअंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

‘डेल्टा प्लस’ बाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून यात रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात आणखी एका डेल्टा प्लसच्या रुग्णाची नोंद झाली असून राज्यात डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या ६६ झाली आहे. बाधितांपैकी दहा जणांनी कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत.

डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोव्हिशिल्ड लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती. मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या लसीकरणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

दरम्यान राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात ५० वर्षांच्या महिलेला डेल्टा प्लसची बाधा झाल्याची माहिती दिली. या महिलेस २२ जुलैला कोरोनाची बाधा झाली होती आणि आता ती बरीदेखील झाली आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या ६६ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष आणि ३४ महिला आहेत. बाधितांपैकी ३१ रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्यामुळे रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नसलेले होते. रुग्णांमध्ये दहा जणांनी लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत, तर आठ जणांनी केवळ एक मात्रा घेतलेली आहे. यांपैकी दोन जणांनी कोव्हॅक्सिन तर उर्वरित जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे.