आता 18 वर्षाखालील आतील यूजर्स सर्च इंजिनवरुन आपला फोटो डिलीट करण्यासाठी करु शकणार गुगलकडे विनंती


नवी दिल्ली : आपल्या 18 वर्षांखालील यूजर्ससाठी इंटरनेट वापरताना अधिक सुरक्षितता मिळावी यासाठी गुगलने आपल्या धोरणामध्ये बदल केला आहे. गुगलने आपल्या 18 वर्षांखालील यूजर्सना त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित बनावे यासाठी त्यांच्या डिजिटल फुटप्रिंटवर अधिक नियंत्रण देण्याची घोषणा केली आहे. गुगलच्या या नव्या धोरणानुसार आता 18 वर्षाच्या आतील यूजर्स हे गुगलला आपले फोटो हे सर्च इंजिनमधून हटवण्याची विनंती करु शकतात.

जर हे यूजर्स अधिक लहान असतील किंवा त्यांना या प्रकारची विनंती करता येऊ शकली नाही तर त्यांचे पालक गुगलकडे तशा प्रकारची विनंती करु शकतात. पण हे फोटो जरी सर्च इंजिनवरुन हटवले तरी वेबसाईटवरुन ते हटवता येणार नसल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. आपण अशा प्रकारचे धोरण येत्या काही आठवड्यात आणणार आहोत, जे 18 वर्षाखालील यूजर्सना किंवा त्यांच्या पालकांना गुगल रिझल्ट्सवरुन त्यांचे फोटो हटवण्यासाठी सक्षम करतील असे गुगलने म्हटले आहे.

जरी फोटो सर्चवरुन हटवला तरी वेबसाईटवरुन तो हटवता येणार नाही. परंतु गुगलच्या या नव्या धोरणामुळे युवकांना त्यांच्या डिजिटल फुटप्रिन्ट्सवर अधिक नियंत्रण ठेवता येणार असल्याचा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे गुगलवर 13 वर्षाच्या आतील वयाच्या यूजर्सना अकाउंट उघडता येत नाही. पण संबंधित अकाउंट हे 13 वर्षाच्या वयाच्या वरच्या यूजर्सचे आहे की बनावट आहे हे तपासण्यासाठी गुगलकडे सध्या कोणतेही साधन नसल्यामुळे येत्या काळात गुगल आपल्या यूट्यूब, गुगल सर्च अॅप, आणि इतर साईटवर बदल करण्याच्या तयारीत आहे.

यंग यूजर्सनी ज्या कन्टेन्टला सर्च केले नाही, तो कन्टेन्ट गुगलवर दाखवला जाणार नसल्याचेही गुगलने स्पष्ट केले आहे. तसेच गुगल आता नवीन सुविधा सुरु करण्याच्या तयारीत आहे. इंटरनेटवरील कोणते अॅप हे प्रौढांसाठी आहे याची माहिती गुगल आता 18 वर्षांच्या आतील यूजर्सना आणि त्यांच्या पालकांना देणार आहे.