नरेंद्र मोदींचा फोटो कोरोना लस प्रमाणपत्रावर का ? सरकारने दिले उत्तर


नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांना एक सर्टिफिकेट देण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो त्या सर्टिफिकेटवर छापण्यात आला आहे. पंतप्रधानांचा फोटो हा केवळ व्यापक जनहितासाठी असून तो लसीकरणानंतरही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठीच लावण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी संसदेत सांगितले.

या संबंधी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी एक प्रश्न विचारला होता. कोरोनाच्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे, तशी त्याची गरज आहे का किंवा ते बंधनकारक करण्यात आले आहे का आणि यामागे काय कारण आहे, असा प्रश्न खासदार कुमार केतकरांनी राज्यसभेत विचारला होता.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कुमार केतकरांच्या या लिखित स्वरुपाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या की, पंतप्रधानांचा कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर फोटो हा व्यापक जनहितासाठीच लावण्यात आला आहे. लस घेतल्यानंतरही लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांबद्दल जागरुकता निर्माण करण्याासाठी हा फोटो लावण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांबद्दल लोकांमध्ये परिणामकारक जागरुकता निर्माण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पुढे म्हणाल्या की, आपल्या देशातील कोरोना लसीचे सर्टिफिकेट तयार करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मानदंडांचे पालन करण्यात आले आहे.

पोलिओ आणि इतर प्रकारच्या लसींचेही प्रमाणपत्र या आधीच्या केंद्र सरकारांनी दिले आहेत. त्या प्रमाणपत्रावर आधीच्या पंतप्रधानांचा फोटो छापणे बंधनकारक केले नव्हते का किंवा आवश्यक केले नव्हते का असा प्रश्न राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर मात्र केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले नाही.