ऑफलाईन लोकल रेल्वे पास वितरणाला आजपासून सुरुवात, असा मिळेल पास


मुंबई : ज्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना मुंबई लोकल रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेत निर्णय जाहीर केला. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. एक विशिष्ट यंत्रणा त्यासाठी तयार करण्यात आली आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

लोकल रेल्वे प्रवास करणे नागरिकांना सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा यासाठी कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्यांची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया आजपासून सुरु होत असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

नागरिकांना त्याआधारे मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. यासाठी ऑनलाईन अॅप तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अॅप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीतच सुरु होईल अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. त्याआधी 11 ऑगस्टपासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, असे चहल यांनी म्हटले आहे.

पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी रेल्वे मासिक पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.

अशा प्रकारे मिळेल नागरिकांना पास

  • नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक
  • दिनांक 15 ऑगस्टपासून पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना प्रवासाची मुभा
  • मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष
  • संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 स्थानकांवर मदत कक्ष
  • सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष राहणार कार्यरत
  • घरानजीकच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करु नये
  • बनावट कोविड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कार्यवाही

नागरिकाच्या कोविड प्रमाणपत्राची सत्यता मदत कक्षावरील महापालिकेचे कर्मचारी संबंधित कोविन अॅपवर पडताळतील. तसेच छायाचित्र पुरावा देखील तपासतील. दोन्ही कागदपत्रं पडताळल्यानंतर त्यावर शिक्का मारण्यात येईल. हे शिक्का मारलेली कागदपत्रे रेल्वे स्थानकाच्या तिकिट खिडकीवर सादर केल्यावर मासिक पास मिळणार आहे. पण हा पास 15 ऑगस्टनंतरच लागू होईल.