नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर फरार


नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात नाशिक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर आहेत. एसीबीने त्यांच्यावर आठ लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई केली आहे. पण लाचखोर अधिकारी वैशाली झनकर वीर या फरार झाल्या आहेत. त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. रात्री उशीर झाल्यामुळे वैशाली यांना समजपत्र देऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. पण त्या अद्यापही हजर झाल्या नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार असल्याचे न्यायालयात सांगितले. तर इतर आरोपी पंकज दशपुते आणि ज्ञानेश्वर येवेल या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालकावर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले यांना अटक केली असून शिक्षणाधिकारी वैशाली वीर चौकशीसाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात होणार हजर होणार आहेत.

राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै 2021 ला शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी 9 लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता तक्रारदाराकडे केली. 27 जुलैला तडजोडीअंती 8 लाख रुपये वीर यांनी मान्य केले.

शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फत ही लाच काल संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई नाशिकमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरते आहे.

लाचलुचपत विभागाची रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात चौकशी सुरू होती. कोरोनाकाळात ग्रामीण भागातील शाळांचे नियोजन आणि इतर महत्वाच्या कामांची वैशाली वीर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असतानाच हा प्रकार समोर आल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. वैशाली वीर यांनी अशाप्रकारे गैरमार्गाने अजून किती संपत्ती गोळा केली आहे ? यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे ? हे आता चौकशीनंतरच समोर येईल.