कुपोषण कमी करण्यासाठी स्थानिक भाषेत जनजागृती करा – यशोमती ठाकूर


नंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बालवयात होणारे विवाह रोखण्यासाठी स्थानिक बोलीभाषेत जनजागृती करण्यात यावी, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, विनायकराव देशमुख आदी उपस्थित होते.

ठाकूर म्हणाल्या, कुपोषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. नवजात अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी मातांच्या पोषणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य व बालकांचे पोषण याबाबत माहिती देण्यात यावी. बालकांच्या आहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. दुर्गम भागात अंगणवाड्याची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाई करण्यात यावी. सर्व शासकीय कार्यालयात विशाखा समित्यांची स्थापना करण्यात यावी. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने महिला व बालभवन उभारावे. कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना वात्सल्य योजनेचा लाभ देण्यात यावा. कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी महिन्यातून एकदा जिल्हा कृतीदलाची स्थापना करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले, दुर्गम भागातील घरे विखुरलेली असल्याने अंगणवाड्याची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आदिवासी भागातील कुपोषण दूर करण्यासाठी व पारंपरिक गैरसमजुती दूर करण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्न करण्यात येत असून लवकरच याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेअंतर्गत भगर पीकाची निवड करण्यात आली असून भगरीपासून पौष्टीक पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे.

दुर्गम भागातील अंगणवाडी बांधकामासाठी डोंगराळ भागातील वाहतूक लक्षात घेता बांधकामासाठी अधिकच्या खर्चाला मंजुरी देणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी खत्री यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

नंदुरबार येथील हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकरण करण्याची सूचनाही महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी केली. त्यांच्या हस्ते चिमलखेडीसारख्या दुर्गम भागात कोविड काळातही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या रेलू वसावे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, मीनल करनवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महिला बचत गटांना धनादेश वाटप
राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाच्या धनादेशाचे वितरण महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यात ओम शांती महिला बचत गटाला 5 लाख, साईश्रद्धा महिला बचत गटाला 2 लाख आणि आदर्श महिला बचत गटाला 4 लाखाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

‘तेजश्री आर्मी’ योजनेअंतर्गत बालिकांना प्रातिनिधीक स्वरुपात कराटे किटचे आणि कोविडमुळे पती गमावलेल्या महिलेला 10 हजार रुपयाचे धनादेशाचे वितरणही ॲड.ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळातर्फे कापडी पिशव्या तयार करण्याचे काम मिळाले आहे. यामुळे 250 महिलांना रोजगार मिळाला आहे. या महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे विमोचन मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले.

कोविड परिस्थितीचा आढावा
ॲड. ठाकूर यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. तिसऱ्या लाटेच्यादृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची त्यांनी माहिती घेतली. बालकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली.