जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी दिल्या शुभेच्छा


मुंबई : आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या माध्यमातून स्वशासन या आधारे स्वतंत्र जीवनशैली जगणाऱ्या लढवय्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पाडवी म्हणाले की, आधुनिक जगात प्रगतीच्या दिशेने जाताना आपल्या गौरवशाली परंपराचे जतन करणारा आदिवासी समाज हा एकमेव आहे. दुर्गम भागात राहूनही आता हा समाज आधुनिकतेची कास धरत आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचे काम राज्य सरकार करत आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

लॉकडाउन काळात आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजनेतून बँक खात्यात थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच अन्न धान्याचे किट वितरण सुरू आहे. केंद्रीय व राज्यातील प्रशासनात आदिवासी तरुणांचा टक्का वाढावा यासाठी सहाय्य करण्यात येत आहे. अशा विविध योजनांतून आदिवासी बांधवाना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर राहिलेल्या आदिवासी क्रांतीकारकांना अभिवादन करून सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो, असेही ॲड. पाडवी म्हणाले.