या महाशयांना झाली आहे तब्बल 1267 हूनही अधिक वेळा तुरुंगवासाची शिक्षा


एखादी व्यक्ती तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकूण किती वेळा तुरुंगात टाकली जाऊ शकते याचा विचार केल्यास एकदा, दोनदा, आणि अगदी सराईत गुन्हेगार असेल, तर कदाचित तुरुंगामध्ये आणखी काही खेपा.. पण जगामध्ये एक असाही मनुष्य अस्तित्वात आहे, ज्याला आजवर तब्बल १५०० हूनही अधिक वेळा तुरुंगात धाडले गेले आहे असे जर तुम्हाला सांगितले, तर तुमचा यावर सहज विश्वास बसेल? पण अमेरिकेमधील केंटकी प्रांतामध्ये राहणाऱ्या हेन्री अर्ल नामक मनुष्याला त्याच्या आजवरच्या आयुष्यामध्ये तब्बल 1267 पेक्षा जास्त वेळा, निरनिराळ्या आरोपांसाठी गजाआड जावे लागले आहे. त्याचे हे गुन्हे अर्थातच फारसे गंभीर स्वरूपाचे नसल्याने त्याला काही दिवसांनी सोडूनही देण्यात येत असे. मात्र त्यानंतर काहीच काळामध्ये पुन्हा काही ना काही कारणास्तव याला तुरुंगवासही शिक्षा सुनाविण्यात येत असे. अश्या रीतीने, वयाच्या पासष्टाव्या वर्षी देखील हेन्रीला अलीकडेच लेक्झिंग्टन अॅव्हेन्यू जवळील एका आलिशान रेस्टॉरंटच्या बाहेर मद्याच्या नशेमध्ये गोंधळ घातला असता, पोलिसांनी अटक करून पुन्हा एकदा गजाआड केले असल्याचे वृत्त आहे.

हा इसम वयाच्या त्याच्या वयाच्या विसाव्या वर्षी सर्वप्रथम तुरुंगात गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत तुरुंगाच्या अनेक वाऱ्या केल्या असल्याने पोलीस खात्यामध्ये हेन्री सर्वांच्याच चांगला परिचयाचा झाला आहे. हेन्रीच्या बहुतेक सर्वच तुरुंगाच्या वाऱ्यांसाठी त्याचे मद्याचे व्यसन जबाबदार असून, क्वचित एखाद्याच्या खासगी प्रॉपर्टीमध्ये अनधिकृत रित्या प्रवेश केल्याच्या आरोपावरूनही त्याला अटक झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हेन्रीने स्वतःचा चौसष्टावा वाढदिवसही तुरुंगातच साजरा केला असून, आजवर साधारण दर आठवड्यात एकदा तरी हेन्रीला अटक होत आली आहे. काही वेळा तर दुपारच्या वेळी तुरुंगातून सुटका होऊन घरी जाण्याची परवानगी मिळाली असता, त्याच रात्री हेन्रीची रवानगी पुनश्च पोलीस कोठडीमध्ये होण्याच्या घटना ही घडल्या आहेत. यंदाच्या वर्षीच्या मागील सहा महिन्यांमध्ये हेन्रीला पाच वेळा अटक झाली आहे. या हिशोबाने हेन्रीला दरवर्षी सुमारे बारा ते तेरा वेळा अटक होत असल्याचे लेक्झिंग्टन पोलीस डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment