अकोला – जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलन करण्यासाठी जिल्ह्यात दिव्यांग सर्व्हेक्षण राबविण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणामुळे दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलगामी योजना तयार करुन त्या राबविण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तेव्हा दिव्यांग सर्व्हेक्षणाचा हा ‘अकोला पॅटर्न’ हा देशाला दिशादर्शक ठरावा, अशी अपेक्षा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
दिव्यांग सर्व्हेक्षणाचा ‘अकोला पॅटर्न’ देशाला दिशादर्शक ठरावा – बच्चू कडू
जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला, स्वरुप चॅरीटेबल फाऊंडेशन, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवणदोष असणाऱ्या दिव्यांगांना श्रवण यंत्राचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग सर्व्हेक्षणाची सुरुवातही करण्यात आली. त्यावेळी ना. कडू बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, समाजकल्याण अधिकारी डी.एम. पुंड,स्वरुप चॅरीटेबल ट्रस्टचे सुरेश पिल्ले, विजय कानेटकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ना. कडू यांच्या हस्ते श्रवणदोष असणाऱ्या मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षणाबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करणारे व संपूर्ण सर्व्हेक्षणाचे ऑनलाईन संचलन करणारे निलेश छडवेलकर यांनी ऑनलाईन पद्धतीने पुणे येथून माहिती दिली. त्यानंतर दिव्यांग सर्व्हेक्षण ॲपचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना ना. कडू म्हणाले की, दिव्यांगांची सेवा करणे हे पुण्याचे काम आहे. या सर्व्हेक्षणामुळे आपण प्रत्येक घराघरात पोहोचाल. त्यासाठी प्रत्येक आशा सेविका ताईंवर मोठी जबाबदारी आहे. हे सर्व्हेक्षण अधिकाधिक अचूक व्हावे यासाठी सगळ्यांची प्रामाणीक प्रयत्न करावे. या सर्व्हेक्षणामुळे दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, तसेच नव्याने काही योजना तयार करण्यात मदत होईल आणि त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल,असे त्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सर्व्हेक्षणामुळे राज्यापुढे देशापुढे एक नवीन संकल्पना मांडता येईल, त्यामुळे दिव्यांग सर्व्हेक्षणाचा अकोला पॅटर्न देशाला दिशादर्शक ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केले तर सूत्रसंचालन विजय कानेटकर यांनी व आभार प्रदर्शन डी. एम . पुंड यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित कर्णबधिरांसाठी श्रीमती सुषमा बोथरकर यांनी अनुवाद केला.