या गावातील लोक झाले अचानक गायब !


८९ वर्षांचा काळ उलटून गेला, तरी कॅनडा देशातील एका गावाशी निगडीत रहस्याची उकल आजतागायत झालेली नाही. त्याकाळी येथील किवालिक प्रांतामध्ये अंजीकुनी सरोवराच्या जवळ एका गावामध्ये अनेक परिवार मोठ्या गुण्यागोविंदाने रहात असत. गाव लहानसे असले, तरी संपन्न होते. लोक या गावामध्ये आनंदाने, समाधानाने रहात असत. मात्र असे काय घडले, की ज्यामुळे हे लोक रातोरात आपला गाव, आपले घर सोडून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडले, हे मात्र आजतागायत कोणीही सांगू शकलेले नाही. घरांमधून बाहेर पडताना या लोकांनी आपल्या कुठल्याही वस्तू बरोबर नेल्या नाहीत, त्यावरून हे लोक अतिशय अचानक, घाईगडबडीतच घरातून निघून गेले असावेत हे सिद्ध होत असले, तरी हे लोक नेमके कुठे गेले, का गेले, ते आजवर परतले का नाहीत, आता हे सर्व लोक कुठे आहेत, त्यांचे काही बरे-वाईट तर झाले नसेल ना, असे प्रश्न अनेक असले, तरी या प्रश्नांची उत्तरे मात्र कोणाकडेही नाहीत.

ही घटना आहे १९३९ सालची. जो लाबेल नामक एक फर ट्रॅपर (जनावरांच्या कातडीपासून फर मिळविणारा) प्रवास करीत असता, दिवस मावळल्याने त्याने अंजीकुनी गावामध्ये मुक्काम करण्याचे ठरविले. त्याकाळी अंजीकुनी गावामध्ये अनेक फर ट्रॅपर्स मुक्कामाला येत असत, आणि ग्रामस्थ मंडळी त्यांचा उत्तम पाहुणचार करीत असत. म्हणूनच जोने देखील गावामधेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने गावामध्ये प्रवेश केला, पण त्याला कुठेच कसलीच हालचाल दिसेना. त्याने मदत मागण्याच्या उद्देशाने दोन तीन घरांमध्ये सहज डोकावून पाहिले, तर तेथील दृश्य आणखीनच बुचकळ्यात टाकणारे होते. कुठे चुलीवर गरम अन्न शिजत होते, तर कुठे कोणी तरी कपडे शिवत बसल्याचे दिसून येत होते, कारण कपड्यामध्ये सुई-दोरा अडकवून ठेवला होता. पण सर्व घरांमधून माणसे मात्र गायब होती. जोने ज्या म्हणून घरामध्ये डोकवून पाहिले, तिथे सगळीकडे त्याला हेच दृश्य दिसले.

गावामध्ये काही तरी भयंकर घडले असावे अशी शंका येऊन लाबेल त्वरेने गावाबाहेर पडला आणि जवळच्या पोलीस स्थानकामध्ये जाऊन त्याने या घटनेची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील गावामध्ये येऊन ग्रामस्थांचा शोध घेत, तेथे काय घडले असावे याचा तपास करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतर आसपासच्या गावांमध्ये चौकशी केली असता, त्या गावांतील लोकांकडून पोलिसांना भलतीच अजब गोष्ट ऐकण्यास मिळाली. या ग्रामस्थांनी दोन दिवस आधी आकाशातून अतिशय प्रकाशमान वस्तू अंजीकुनी गावाच्या दिशेने जाताना पाहिली होती. ग्रामस्थांची ही कहाणी सिद्ध करणारा कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नसल्याने प्रकाशमान वस्तूच्या हकीकतीची शक्याशक्यता पडताळून पाहणे शक्य झाले नाही. तरीही अंजीकुनी गावातील लोक रातोरात अचानक गायब झाले, आणि पुढे त्यांचा कोणताही मागमूस लागू शकला नाही, ही घटना मात्र सत्य आहे, आणि हे रहस्य आजतागायत कायम आहे.

Leave a Comment