दुधाला योग्य दर देण्याला प्राधान्य – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार


नागपूर : दुग्ध व्यवसायाचे जागतिकीकरण झाले आहे. पुरवठा जास्त झाला किंवा कमी झाला तरी दुधाचे दर कमी जास्त होत नाही. याचा परिणाम प्रामुख्याने दुग्ध उत्पादकांना होत असतो. त्यानुसार दुधाला योग्य दर देण्याला प्राधान्य देत असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. यासोबतच गोट फार्मिंगवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रादेशिक दुग्ध व्यवसाय कार्यालयास केदार यांनी भेट दिली. यावेळी कार्यप्रणाली व पदांबाबत प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी हेमंत गडवे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. गडवे यांनी तेथील उत्पादन, कार्यप्रणाली व पदांबाबत माहिती देतांना अॅग्रो व्हिजनद्वारे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाबाबत माहिती देण्यात येत असल्याचे सुध्दा सांगितले. जिल्ह्यात 558 दुग्ध उत्पादक सहकारी संस्था आहेत. तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामात व्यत्यय येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत केदार यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यालय परिसरात केदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.