पावसाळ्यामध्ये गाडीतून प्रवासाला निघताना अशी घ्या खबरदारी


पावसाळ्याचे आगमन झाले, आणि पाहता पाहता पावसाने चांगलाच जोर धरला. होरपळून काढणाऱ्या उन्हाळ्यानंतर बरसणाऱ्या पावसाच्या सरींनी सर्वांना दिलासा दिला, आणि पावसाळ्यामध्ये लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर पडण्याचे, किंवा जवळपासच्या ठिकाणी भटकंतीसाठी जाताना गाडी मधून, पावसाळ्यातील मस्त हवामानाचा आनंद घेत सफर करण्याचा प्लॅन आपल्यापैकी अनेकांनी मनोमन नक्की केला असेल. ऐन पावसाळ्यामध्ये गाडी घेऊन भटकंतीसाठी बाहेर पडण्याचा विचार उत्तम असला, तरी तत्पूर्वी गाडीच्या बाबतीत काही खबरदारी घेणे अगत्याचे आहे.

गाडीच्या काचेवरून पाणी निपटून काढण्यासाठी वायपरचा वापर करण्यापूर्वी गाडीचे वायपर सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. वायपरला लावले जाणारे रबरी पॅडिंग जर खराब झाले असले, तर त्यामुळे गाडीच्या काचेवरील पाणी व्यवस्थित निपटून निघत नाहीच, त्याशिवाय काचेवर लहान लहान चरे पडण्याचा संभव ही अधिक असतो. त्यामुळे भर पावसामध्ये भटकंतीसाठी बाहेर पडण्यापूर्वी गाडीची काच स्वच्छ करून घेऊन गाडीचे वायपरही चांगल्या स्थितीमध्ये असल्याची खात्री करून घेणे अगत्याचे आहे. पावसामध्ये गाडी चालविताना गाडीचे हेड लाईट्स चालू स्थितीमध्ये आणि त्याच्या काचा स्वच्छ असतील याची खात्री करून घ्यावी. पाऊस कोसळत असताना क्वचित धुकेही दाटत असते. अश्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनातील चालकाला आपली गाडी पटकन दिसेलच याची शाश्वती नसते. अश्या वेळी गाडीचे हेडलाईट्स सुरु ठेऊन गाडी चालविणे हे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठरते. ऐन पावसाळ्यामध्ये भटकंतीसाठी बाहेर पडण्यापूर्वी गाडीचे ब्रेक्स तपासणेही महत्वाचे ठरते.

पावसाळ्यामध्ये गाडी ड्राईव्ह करून जातानाचे रस्ते घाटातील असतील, तर जास्त सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दरडी कोसळणे, अचानक पाण्याचा प्रवाह सामोरा येणे अश्या समस्या प्रवासामध्ये उद्भवू शकतात, अश्या वेळी इमर्जन्सी ब्रेकिंगची वेळ आली असता, गाडीचे ब्रेक आणि टायर्स उत्तम स्थितीमध्ये असतील तर दुर्घटना नक्की टाळली जाऊ शकते.

Leave a Comment