टाळी वाजविताच उसळणाऱ्या पाण्याचे रहस्यमयी ‘दलाही कुंड’


जगामध्ये रहस्यमयी म्हणावीत अशी काही जलकुंड अस्तित्वात आहेत, त्यापैकी एक कुंड भारतामध्ये अस्तित्वात आहे. हे रहस्यमयी कुंड झारखंड जिल्ह्यातील बोकारो जिल्ह्यामध्ये असून, याला ‘दलाही कुंड’ या नावाने ओळखले जाते. असे म्हटले जाते, की या कुंडाच्या काठांशी उभे राहून जोराने टाळ्या वाजविल्यास या टाळ्यांच्या आवाजाने कुंडातील पाणी वर उसळ्या मारू लागते. एखाद्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यास ठेवले असता, ज्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे भांड्यामध्ये उसळ्या मारू लागतात, तसेच काहीसे टाळ्या वाजविल्यावर या कुंडातील पाण्याच्या बाबतीत घडते. असे नेमके का घडत असावे, याची कारणमीमांसा आजतागायत भूगर्भशास्त्रज्ञांनाही करता आलेली नाही.

दलाही कुंडाच्या आसपास आता पक्क्या भिंती बांधण्यात आल्या असून, या कुंडातील पाण्याची आणखी एक खासियत अशी, की या कुंडातील पाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार, तर थंडीच्या दिवसांमध्ये गरम असते. हा चमत्कार कसा होतो याचेही कारण आजवर स्पष्ट झालेले नाही. या कुंडातील पाणी औषधी असल्याची मान्यता रूढ असून, या कुंडातील पाण्याने स्नान केल्याने सर्व प्रकारचे चर्मरोग दूर होत असल्याचे म्हटले जाते. या पाण्यामध्ये हिलीयम वायू आणि गंधक असल्याच वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, त्याचमुळे या पाण्यामध्ये स्नान केल्याने चर्मरोग बरे होत असल्याचे म्हटले जाते.

दलाही कुंडाजवळ दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी मोठी जत्रा भरते. या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कुंडातील औषधी पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी अनेक पर्यटक मुदाम येथे येत असतात. या रहस्यमयी कुंडाजवळ दलाही गोसाई नामक देवतेचे मंदिर असून, दर रविवारी या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहावयास मिळत असते.

Leave a Comment