चेहऱ्यावरून अकाली प्रौढत्वाच्या खुणा नाहीश्या करण्यासाठी आजमावा हे उपाय


चाळीशी उलटून गेल्यानंतर चेहऱ्यावर दिसू लागणाऱ्या प्रौढत्वाच्या खुणा आजकालच्या काळामध्ये ऐन विशीमधेच काहींच्या चेहऱ्यांवर दिसून येतात. अयोग्य, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली, सौंदर्य प्रसाधनांचा सातत्याने वापर, सतत उन्हामध्ये त्वचेवर येणारे काळसर डाग, यामुळे ऐन पंचविशीतील तरुण-तरुणी चाळीशी पार केल्यासारखे दिसू लागतात. चेहऱ्यावर पिग्मेंटेशन दिसू लागते, बारीक सुरकुत्या पडू लागतात, त्वचा निस्तेज, कोरडी दिसायला लागून, ढिली पडून लटकूही लागते. या सर्व गोष्टींमुळे चेहरा अनाकर्षक दिसू लागतो. या सर्व समस्या टाळून चेहऱ्यावरून अकाली प्रौढत्वाच्या खुणा नाहीश्या करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आजमावता येऊ शकतात.

चेहऱ्यावरील त्वचा ढिली पडून नेकठिकाणी लटकल्या प्रमाणे दिसू लागते. त्वचा पुन्हा ‘firm’ बनविण्यासाठी अननसाचा वापर हा चांगला पर्याय ठरतो. अननसाचा वापर करण्यासाठी अननसाची साले काढून टाकावीत. अननसाच्या गराचे बारीक तुकडे करून घेऊन हे तुकडे चेहऱ्यावरून हळुवार हाताने फिरवावेत, अथवा अननसाचा गर पिळून रस काढून घ्यावा आणि हा रस चेहऱ्यावर लावावा. हा रस काही वेळ चेहऱ्यावर राहू देऊन त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हा उपाय काही दिवस दररोज करावा. अननसाचा रस नैसर्गिक ‘astringent’ असल्याने ढिली पडलेली त्वचा पुन्हा कसण्यास हा रस अतिशय उपयुक्त ठरतो. हा उपाय अवलंबायचा झाल्यास आपण वापरणार असलेला अननस ताजा आणि पिकलेला असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच अननसाचा रस आधी मनगटाच्या आतील बाजूला लावून पाहावा आणि काही वेळ वाट पहावी. या रसामुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी नसल्याची खात्री पटल्यानंतरच हा रस चेहऱ्यावर लावावा.

आपल्या आहारामध्ये सुका मेवा, तेलबिया, अंडी, मासे, डाळी, मटार, शेंगभाज्या, ताजी फळे, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, इत्यादी पोषक अन्नपदार्थांचा समावेश असेल याची काळजी घ्यावी. आपल्या आहारामध्ये तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड अन्नपदार्थ, अल्कोहोल, कार्बोनेटेड किंवा कॅफिनेटेड पेये, साखरेचे प्रमाण जास्त असल्यास त्यामुळे त्वचेच्या नव्या पेशी तयार होण्यामध्ये अडचण येत असते. त्यामुळे अश्या पदार्थांचे सेवन आपल्या आहारामध्ये मध्ये अतिशय मर्यादित असावे.

चेहऱ्यावरील अकाली प्रौढत्वाच्या खुणा नाहीश्या करण्यासाठी कोरफडीचा ताजा गर वापरावा. कोरफडीच्या ताज्या गरामध्ये गुलाबजल घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे राहू देऊन यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा. कोरफडीचा गर आणि गुलाबजल मिसळून तयार केलेल्या पेस्टमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीश्या होण्यास मदत होते. कोरफडीमुळे चेहऱ्यावरील टिश्यू रिपेअर होण्यास मदत होऊन त्वचा तजेलदार दिसू लागते. कोरफडीप्रमाणे टी ट्री ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल यांचे मिश्रणही चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्वचा तजेलदार बनण्यास सहायक आहे. एक लहान चमचा टी ट्री ऑईल, एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून याने रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मालिश करावी. हे तेल रात्रभर चेहऱ्यावर राहू देऊन सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment