दाक्षिणात्य रसम, आरोग्यास उत्तम


रसम हा पदार्थ दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ असून, गेल्या अनेक शतकांपासून हा पदार्थ दक्षिणेकडील प्रांतांमध्ये घरोघरी अगदी दररोज बनत आला आहे. ‘रसम’ या शब्दाचा अर्थ रस असा असून, या चमचमीत पदार्थाचे सेवन कधी भातासोबत, तर कधी सूपप्रमाणे पिऊन केले जात असते. हा पदार्थ अतिशय पौष्टिक असून, पचण्यासही हलका असल्याने याचा उल्लेख अलीकडच्या काळामध्ये ‘सुपरफूड’ असा करण्यात आला आहे. चिंचेचा कोळ, टोमॅटो घालून उकळलेले पाणी, हे रसम मधील महत्वाचे घटक असून, थोडी तुरीची डाळही यामध्ये घातली जाते. लसूण, धणे, काळे मिरे, हळद, कढीपत्ता इत्यादी मसाल्याचे पदार्थ रसमला आणखी चवदार बनवितात. भारतामध्ये २२० प्रकारचे वेगवेगळे रसम बनविले जात असून, दर प्रांतामध्ये हा पदार्थ बनविण्याची पद्धत काहीशी निराळी आहे. या सर्व प्रकारांमध्ये टोमॅटो रसम सर्वाधिक लोकप्रिय म्हणायला हवे. शेवग्याची फुले, आवळे, आले, आणि लिंबाचा वापर करूनही रसम तयार करता येते. गोडसर चव असणाऱ्या रसमच्या प्रकारांमध्ये गूळ, अननस, इत्यादी पदार्थ वापरून रसम तयार करण्यात येत असतात. मांसाहारी रसम बनविण्याची पद्धतही काही ठिकाणी अस्तित्वात असून, यामध्ये चिकन रसम अतिशय लोकप्रिय आहे.

रसम बनविताना वापरले जाणारे सर्व पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पोषक आहेत. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिंचेच्या कोळामध्ये फायबर मुबलक मात्रेमध्ये आहे. त्यामुळे बद्धकोष्ठाची समस्या दूर होत असून, यामध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्स मुळे त्वचा नितळ आणि तरुण दिसते. रसममध्ये वापरण्यात येणाऱ्या टोमॅटोसारख्या पदार्थांमध्ये थियामीन, क जीवनसत्व, फोलिक अॅसिड, आणि अनेक क्षार असून, या सर्व पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. रसमच्या मसाल्यामध्ये वापरण्यात येणारे काळे मिरे, धणे इत्यादी पदार्थ पचनशक्ती सुधारणारे असून, वजन घटविण्यासाठी सहायक आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment