काळ्या मिऱ्याप्रमाणे पांढरे, हिरवे आणि लाल मिरेही आरोग्यास लाभदायक.


आपल्या सर्वांच्याच स्वयंपाकघरामध्ये काळे मिरे हा मसाल्याचा पदार्थ कायमच असतो. एखाद्या पदार्थाची लज्जत वाढविण्याच्या शिवाय औषधी म्हणूनही काळ्या मिऱ्यांचा वापर फार जुन्या काळापासून केला जात आला आहे. पण काळ्या मिऱ्यांच्या प्रमाणेच पांढरे, हिरवे आणि लाल मिरे देखील अनेक पदार्थांमध्ये वापरले जात असून, मिऱ्याचे हे सर्वच प्रकार आरोग्याच्या दृष्टीने देखील लाभदायक आहेत. पांढरे मिरे आकाराने लहान असून हे झाडावरून तोडल्या नंतर पाण्यामध्ये भिजवून ठेवले जातात. पाण्यामध्ये भिजविल्याने यांच्यावरील पातळ कवच सहज निघण्यास मदत होते. काळ्या मिऱ्याच्या मानाने पांढरे मिरे जरा जास्त तिखट असतात. पांढऱ्या मिऱ्याची पूड अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. मुख्यत्वे पास्ता, आणि हलक्या रंगाच्या ग्रेव्ही बनविताना काळ्या मिरपुडीच्या ऐवजी पांढऱ्या मिऱ्याची पूड वापरण्यात येत असते. पांढरे मिरे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असून, मधुमेहींसाठी देखील यांचा वापर लाभदायक ठरतो.

हिरवे मिरे झाडावरून तोडून वाळविले जातात. हिरव्या मिऱ्याचा सुगंध इतर मिऱ्याच्या मानाने जास्त जाणविणारा असतो. एखाद्या मधुर फळा प्रमाणे याचा सुगंध मधुर असतो. हिरव्या मिऱ्याचा वापर फ्रेंच खाद्य पदार्थांमध्ये जास्त केला जातो. निरनिराळे सॉसेस, सॅलड ड्रेसिंग्ज, सूप्स, पास्ता, आणि सँडविच स्प्रेड्समध्ये या मिऱ्याचा वापर केला जातो. गुलाबी किंवा लाल रंगाचे मिरे पेरू देशामध्ये होतात. चीनी आणि जपानी खाद्यपदार्थांमध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे मिरे वापरून बनविलेला खाद्यपदार्थ मोठ्या आचेवर शिजविला गेल्यास या पदार्थाचा स्वाद बिघडू शकतो. त्यामुले लाल मिरे घालून बनविलेला पदार्थ नेहमी मंद आचेवर आणि अतिशय कमी वेळेकरिता शिजविला जात असतो.

हिरव्या मिऱ्याच्या वापराने पचनशक्ती सुधारते. ज्यांना गॅसेसची समस्या वारंवार जाणवत असेल, त्यांनी आहारामध्ये हिरव्या मिऱ्याचा समावेश करावा. पोटाच्या अनेक विकारांसाठी देखील हिरवे मिरे सहायक आहेत. हिरव्या मिऱ्यामध्ये लोह, के जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. लाल मिऱ्याच्या सेवनाने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहत असून, यामध्ये कर्करोग प्रतिकारक शक्ती आहेत. लाल मिऱ्याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment