‘खाई के पान बनारसवाला’…


‘खाई के पान बनारसवाला, खुल जाये बंद अकल का ताला’.. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले हे गीत बनारस, म्हणजेच वाराणसीच्या बहुतेक पानाच्या गाद्यांवर ऐकायला मिळत असते. पण बनारस येथील बनारसी पानांना लोकप्रियता या गीतामुळे लाभली हा समज मात्र साफ चुकीचा आहे. बनारस येथील विडे मुघल शासनकाळापासूनच खूप लोकप्रिय होते. बनारसमधील प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक चौकात एखादी पानाची गादी हमखास आढळतेच. पण यामध्येही काही पानांच्या गाद्या अश्या आहेत, की तिथे मिळणाऱ्या पानाची लोकप्रियता भारतभरातच नाही, तर परदेशापर्यंतही जाऊन पोहचलेली आहे. या पानांचा स्वाद आणि सुगंध या पानाची खासियत असून, हे पान खाण्यासाठी लोक मुद्दाम येथे असतात.

खास बनारसी पान, उत्साह, आनंद आणि मनापासून केलेल्या पाहुणचाराचे प्रतीक मानले जात आले आहे. प्राचीन काळी घरी पाहुणे आल्यास त्यांचे स्वागत करण्याच्या उद्देशाने त्यांच्यासमोर पानाचे तबक ठेवण्याची रीत असे. बनारसी पान तयार करणारे ‘पनवाडी’ हे पान ऐनवेळी, अगदी ग्राहकाच्या डोळ्यांदेखत तयार करीत असताना पाहणे हा देखील एक आगळा अनुभव म्हणायला हवा. अतिशय मन लावून, मोठ्या प्रेमाने हे पनवाडी पान तयार करीत असतात. बनारसी पान बनारसची खासियत आहेच, पण त्याशिवाय हे पान विकणाऱ्या काही खास पानाच्या गाद्याही बनारसमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यातीलच ‘कृष्णा पान भांडार’ नामक पानाची गादी बनारसच्या नदेसर भागामध्ये असून, हे पानभंडार सुमारे शंभर वर्षे जुने आहे. या पानभंडारामध्ये हर तऱ्हेचे पान उपलब्ध आहे, मात्र छोट्या पानांनी तयार करण्यात आलेला विडा येथील खासियत आहे. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया पासून पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयीं सारख्या मातब्बर मंडळींनी येथील पानाचा आस्वाद घेतला आहे. या पान भांडारामध्ये तयार करण्यात येणाऱ्या पानांची किंमत पाच रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत आहे.

सत्तर वर्षे जुने ‘गामा पान भांडार’ बनारसच्या गदौलिया भागामध्ये आहे. येथील ‘गिल्लौरी पान’ हा पानाचा प्रकार येथील खासियत आहे. बनारसच्या ‘लंका’ चौकातील ‘केशव तांबूल भांडार’ साठ वर्षे जुने पान भांडार असून, या ठिकाणी मिळणारे जर्दा पान आणि मीठा पान या ठिकाणची खासियत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरुख खान पर्यंत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीजनी येथील पानाचा आस्वाद घेतला आहे. दीडशे वर्षे जुने असलेल्या ‘दीपक तांबूल भांडार’ येथील मघई, जगन्नाथी, देशी आणि सांची हे पानांचे प्रकार लोकप्रिय आहेत.

Leave a Comment