‘खेलरत्न’च्या नामांतरासारखीच तुम्ही राजीनामा द्या, अशीही जनतेची मागणी; राष्ट्रवादीचा मोदींना टोला


पुणे – देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्यात आले असून हा पुरस्कार यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. यासाठी देशभरातून लोकांच्या विनंत्या येत होत्या त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दरम्यान यावरुन मोदींवर विरोधक टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘खेलरत्न’च्या नामांतरावरुन मोदींना टोला लगावला आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचे नाव जनतेची मागणी होती म्हणून बदलले, हे चांगले आहे, पण अजूनही जनतेच्या काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. यामध्ये महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि तुम्ही पंतप्रधान पदाचा राजीनामा द्या, या मागणीचा प्रामुख्याने समावेश आहे.

नेहरु-गांधी नावाचा केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच करण्यात आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.