पूरग्रस्तांना वाढीव दरानेच मदत – विजय वडेट्टीवार


मुंबई : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करताना राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी ११, ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या मदतीमध्ये तात्काळ मदतीसाठी १५०० कोटी रूपये, पुनर्बांधणीसाठी ३००० कोटी व उपाययोजनांसाठी ७००० कोटी रूपयांची मदत आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या मदतीपेक्षा यावेळी करण्यात आलेल्या मदतीची रक्कम अधिक आहे, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

सानुग्रह अनुदान प्रति कुटुंब १० हजार रुपये

  • कपड्यांच्या नुकसानीकरिता पूर्वी प्रतिकुटुंब २५०० रुपयांची मदत केली जात असे ती वाढवूनप्रति कुटुंब ५ हजार रुपये करण्यात आली.
  • भांड्यांच्या नुकसानीकरिता पूर्वी प्रति कुटुंब २५०० रुपयांची मदत केली जात असे ती वाढवून प्रति कुटुंब ५ हजार रुपये करण्यात आली.

जनावरांच्या नुकसानीकरिता

  • दुधाळ जनावरांकरिता पूर्वी प्रति जनावर ३० हजार रुपये मदत करण्यात येत होती ती वाढवून ४० हजार रुपये करण्यात आली.
  • ओढकाम करणाऱ्या जनावरांकरिता पूर्वी प्रति जनावर २५ हजार रुपये मदत करण्यात येत होती ती वाढवून प्रति जनावर ३० हजार रुपये करण्यात आली.
  • ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांकरिता पूर्वी प्रति जनावर १६ हजार रुपये मदत करण्यात येत होती ती वाढवून प्रति जनावर २० हजार रुपये करण्यात आली.
  • मेंढी/बकरी/डुक्कर यासाठी पूर्वी प्रति जनावर ३ हजार रुपयांची मदत करण्यात येत होती ती वाढवून ४ हजार रुपये प्रति जनावर करण्यात आली.(कमाल 3 दुधाळ जनावरे किंवा कमाल 3 ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल 6 लहान ओढकाम करणारे जनावरे किंवा कमाल 30 लहान दुधाळ जनावरे प्रति कुटुंब या मर्यादेत).
  • कुक्कुटपालन पक्षी- रु 50/- प्रति पक्षी,अधिकतम रु 5000/- रुपये प्रति कुटुंब.

घरांच्या पडझडीसाठी

  • सखल भागातील पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी पूर्वी ९५,१०० रुपयांची मदत करण्यात येत होती ती वाढवून १ लाख ५० हजार इतकी करण्यात आली.
  • दुर्गम भागातील कच्च्या पक्क्या घरांच्या नुकसानीसाठी पूर्वी १,०१,९०० रुपयांची मदत करण्यात येत होती ती वाढवून १ लाख ५० हजार रुपये करण्यात आली.
  • अंशत: पडझड झालेल्या म्हणजे किमान ५० टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी पूर्वी ६ हजार रुपये प्रति घर अशी मदत केली जात होती ती वाढवून आता प्रति घर ५० हजार करण्यात आली.
  • अंशत: पडझड झालेल्या म्हणजे किमान २५ टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी पूर्वी प्रति घर ६ हजार रुपयांची मदत केली जात होती ती वाढवून २५ हजार रुपये करण्यात आली.
  • अंशत: किमान १५ टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी पूर्वी प्रति घर ६ हजार रुपयांची मदत केली जात होती ती वाढवून आता प्रति घर १५ हजार करण्यात आली.
  • नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी पूर्वी प्रति झोपडी ६ हजार रुपयांची मदत केली जात होती ती वाढवून प्रति झोपडी १५ हजार रुपये करण्यात आली.

मत्स्यबोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी

  • अंशत: मत्स्यबोटींच्या नुकसानीसाठी पूर्वी ४१०० रुपये मदत देण्यात येत होती ती वाढवून आता १० हजार रुपये करण्यात आली आहे.
  • पूर्णत: नुकसान झालेल्या मत्स्यबोटीसाठी पूर्वी ९६०० रुपयांची मदत करण्यात येत होती ती वाढवून आता २५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
  • जाळ्यांच्या अंशत: नुकसानीसाठी पूर्वी २१०० रुपयांची मदत देण्यात येत होती ती वाढवून आता ५ हजार रुपये करण्यात आली आहे
  • जाळ्यांच्या पूर्णत: नुकसानीसाठी पूर्वी २६०० रुपयांची मदत करण्यात येत होती ती वाढवून आता ५ हजार रुपये करण्यात आली आहे.

हस्तकला/कारागिरांना अर्थसहाय्य

  • पूर्वी हस्तकला संयंत्रांच्या नुकसानीसाठी ४१०० रुपयांची मदत देण्यात येत होती ती वाढवून आता नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये करण्यात आली आहे.हस्तकला व हातमाग कारागीर यामध्ये बारा बलुतेदार,मुर्तीकार इत्यादी यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आलीआहे.
  • कच्च्या मालाच्या नुकसानीसाठी पूर्वी ४१०० रुपयांची मदत देण्यात येत होती ती वाढवून आता नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

दुकानदार व टपरीधारकांना – दुकानदार व टपरीधारक यांचे नुकसान झाल्यास पूर्वी काहीच मदत देण्यात येत नव्हती. यावेळी मदतीसाठी त्यांचा नव्याने समावेश करण्यात आला असून त्यांनाही नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त 50,000/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुक्कुटपालन शेडकरिता – कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीकरिता पूर्वी काहीच मदत करण्यात येत नव्हती त्याचाही मदतीच्या या बाबींमध्ये नव्याने समावेश करून ५ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.