दोन डोस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार करा, उच्च न्यायालयाचा सल्ला


मुंबई – राज्य सरकारने काही जिल्ह्यातील निर्बंध जरी शिथिल केले असले तरी अद्यापही सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल मात्र बंद आहेत. दरम्यान जर बसमधील गर्दी चालते, तर मग लोकलमधील गर्दी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिक, पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा, असा सल्लाही दिला आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंबंधी पुढील गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

बस आणि अन्य सार्वजनिक वाहनांतून गर्दीने प्रवास चालू शकतो. मग लोकलमधून का नाही? तिथे संसर्ग होणार नाही का?, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिक आणि पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा, असा सल्ला दिला. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील नागरिकांच्या गरजा वेगळ्या आहेत. लोकल प्रवास ही मुख्य गरज असल्याचेही यावेळी उच्च न्यायालयाने नमूद केले.

विशेष म्हणजे यावेळी उच्च न्यायालयाने पत्रकारांना लोकलने प्रवास करण्यावर बंदी असल्याचे माहिती पडल्यावर आश्चर्य व्यक्त केले. सगळे सुरू केले जात असताना विशिष्ट वर्गाला मज्जाव करणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने मांडले. उच्च न्यायालयाने सरकारला पुढील गुरुवारी याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.