मुंबईत होणार करोना जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट

देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये आता करोनाच्या व्हेरीयंट साठीच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कस्तुरबा गांधी रुग्णालयात करोना सिक्वेन्सिंग मॉलीक्यूलर प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. यामुळे करोनाच्या विविध व्हेरीयंटची माहिती त्वरित मिळू शकणार आहे. यासाठी उपलब्ध केलेल्या मशीनमध्ये एकाचवेळी ३८४ नमुने तपासण्याची सुविधा आहे आणि चार दिवसात करोनाचे नवे व्हेरीयंट कोणते याचा निष्कर्ष काढता येणार आहे.

या संदर्भात बृहन्मुंबई म्युनिसिपल कार्पोरेशन म्हणजे बीएमसी मधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे नवे मशीन गुरुवारीच सिंगापूर मधून मुंबईत आले होते. अमेरिकेच्या इलुम्निया कंपनीने सीएसआर फंडातून ६.४० कोटी किमतीचे हे मशीन देणगी म्हणून दिले आहे. एटीई चंद्रा फाउंडेशनने सुद्धा ४ कोटींची मदत दिली आहे. एका नमुना चाचणीसाठी येणारा खर्च १० हजाराच्या घरात आहे त्यामुळे कंपनीने मशीनसह ६५०० टेस्टिंग किट सुद्धा दिली असल्याचे समजते.