मराठवाडा विभागासाठी जालना येथे १०४ कोटींच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाला मंजूरी


मुंबई : राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्‍नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्‍णालये कार्यरत असून सद्यस्थितीत मराठवाडा विभागासाठी एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही. मानसिक रुग्णांचे आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन यासाठी होणारी गैरसोय टाळण्याकरीता तसेच मानसिक आरोग्य विषयक सुविधा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध होण्यासाठी जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे व मनुष्यबळ यासाठी एकूण रुपये १०४.४४ कोटी एवढा अंदाजित खर्च अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या भागात प्रादेशिक मनोरुग्णालय व्हावे यासाठी मी पाठपुरावा करीत होतो. मराठवाडा व विदर्भातील किमान १० जिल्ह्यांच्या मध्यवर्ती जालना शहर असून या भागातील रुग्‍णांना उपचाराकरिता पुणे अथवा नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्‍णालयात दाखल करावे लागते. राष्ट्रीय मानिसक आरोग्य कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयांची संख्या वाढविण्याची आवश्यकता लक्षात घेता मराठवाड्यातील रुग्णांसाठी याभागात मनोरुग्णालय सुरू करणे आवश्यक होते. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाडा विभागात मनोरुग्णालय नसल्याने रुग्णांना नागपूर आणि पुणे येथे जावे लागते. हे अंतर जास्त असल्याने रुग्णांचे येण्याजाण्याचे हाल होतात. त्यामुळे जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय सुरू झाल्यास या भागातील रुग्णांची सोय होणार आहे. जालना येथे शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी अथवा भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून त्यासाठी आवश्यक ती पदनिर्मिती आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून तात्काळ मनोरुग्णालय सुरू केले जाईल. त्यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, ईसीटी विभाग, व्यवसाय उपचार विभागांतर्गत संगीत उपचार, योगा उपचार व विविध उपक्रम, चाचणी प्रयोगशाळा, समुपदेशन विभाग आदि सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.

समाजामध्ये सद्यस्थितीत मानसिक आजाराचे प्रमाण वाढत असून, त्यासाठी मनुष्‍याच्‍या दैनंदिन जीवनामधील कामाचा ताण तसेच कौटुंबिक, आर्थिक तणाव इत्यादी अनेक घटक कारणीभूत आहेत. मानसिक आजाराचे योग्य निदान करण्यासाठी पुरेशा चाचण्या, परिक्षणे उपलब्ध नसल्यामुळे मानसिक रोगाचे निदान करणे हे इतर आजारांपेक्षा कठीण आहे. मानसिक आरोग्य विषयक सेवा सुविधांमध्ये वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.