महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संयुक्त परीक्षेची घोषणा; 4 सप्टेंबरला होणार परीक्षा


मुंबई – आता 4 सप्टेंबर रोजी एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी घेतली जाईल. आधी 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. आयोगाने याबाबत परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. 3 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय राज्य सरकारने कळवला होता.

परीक्षेच्या आयोजनासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात अधिक माहितीसाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हीच परीक्षा 4 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. परीक्षा घेण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिल्यामुळे परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षेचे आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही केले आहे.