कॉर्पोरेट कंपन्यांनी आपत्ती काळात दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे – उद्योगमंत्री


मुंबई : नैसर्गिक आपत्ती, महामारी अशा संकट काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात समुपदेशन तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर येथील जम्बो कोविड केअर केंद्रामध्ये हनिवेल कंपनीच्या वतीने सर्व सुविधायुक्त अतिदक्षता विभागाची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शासनाच्या आरोग्य विभागाला हनिवेल कंपनीने ही मोलाचे सहकार्य केले. हेच सामाजिक दायित्व जपत कंपनीने दहिसर येथील जम्बो कोविड केंद्रामध्ये अतिदक्षता केंद्र सुरू केले आहे. त्याचे अनावरण देसाई यांनी केले. या अतिदक्षता केंद्रात व्हेंटीलेटर्स, फ्लॉवर बेड्स, बी आय पॅप मशिन्स, मॉनिटर्स, एक्स रे मशिन्स, इसिजी मशिन्स आदी सुविधा उपलब्ध आहेत.

नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आरोग्यक्षेत्रात हनिवेल कंपनी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. या पुढील काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीच्या काळात काम करण्याची गरज असल्याचे देसाई म्हणाले. यावेळी कंपनीचे भारतातील प्रमुख आशिष गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.