कोरोना निर्बंधांची नवी नियमावली जाहीर ; पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमधील निर्बंध कायम!


मुंबई – राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉक बाबतची नवी नियमावली राज्य सरकारने आज जाहीर केली आहे. यामध्ये व्यापारी वर्गांचा रोष पाहता व आज सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्या प्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत.

या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचे विशेष करून व्यापाऱ्याचे जास्त लक्ष लागले होते. यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. कारण, ज्या भागात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी दिली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण कमी होत आहेत त्याठिकाणच्या नागरिकांसाठी हा दिलासा असणार आहे. तर, पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.

या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. तर, रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच उघडी असणार आहेत. तर, धार्मिकस्थळ उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, राज्यभरात धार्मिकस्थळे ही बंदच राहणार आहेत.