मेट्रो चाचणी कार्यक्रमावरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा;…तर यापुढे कार्यक्रम होऊ देणार नाही


पुणे – दोन दिवसांपूर्वीच पुण्यात मेट्रोची पहिली ट्रायल रनची चाचणी झाली. त्यावेळी मी, बापट पुण्यात नसताना हा कार्यक्रम घेण्यात आला. तरीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही सहभागी झालो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर नव्हता, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

पुणे मेट्रोला २०१६मध्ये परवानगी मिळाली. त्यावेळी अजित पवार नव्हते. मोदी आणि देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे यापुढे जर कार्यक्रमाला आम्हाला बोलावले नाही, तर कार्यक्रम होऊ देणार नाही. तसेच शेवटच्या कार्यक्रमांना मोदींना बोलवावे लागेल, अशी भूमिकाही यावेळी त्यांनी मांडली.

दरम्यान मला परप्रांतीयाबाबतच्या राज ठाकरेंच्या भाषणाची क्लिप मिळाली आहे. मी ते भाषण ऐकले असून त्याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत. त्यावर येत्या दोन दिवसांत राज ठाकरे यांची भेट घेऊन मी चर्चा करणार आहे. पण आमच्यात युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. युतीबाबत केंद्रातील आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.

परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर माझी आणि राज ठाकरेंची चर्चा सुरू असून मुझे तो आमसे मतलब है, चर्चेतून प्रश्न सुटतात असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाली होती. यानंतर त्यांच्या युतीची चर्चा झाल्याचे बोलले जात होते. तसेच राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना आपल्या परप्रांतीयांच्या भूमिकेसंबंधी गैरसमज दूर व्हावेत, यासाठी ऑडिओ क्लिप पाठवल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये झळकले होते. पण हे वृत्त राज ठाकरेंनी फेटाळले होते.

चंद्रकांत पाटील यांना प्रसाद लाड यांच्या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असून आता तो विषय आमच्यासाठी संपला आहे. महाराष्ट्रची ही संस्कृती नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यावर ते म्हणाले की, तुम्ही काहीही बोलाल का? ते मानसिक संतुलन बिघडले असे म्हणतात. काही सूचना केल्या तरी ते बोलतात. आदित्य ठाकरे बोलत नव्हते ते आता बोलायला लागले.

राज्यपालाची खुर्ची सोडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलावे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर ते म्हणाले की, राज्यपाल यांच्यावर काहीही बोलायची परंपरा सुरू झाली आहे. त्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. ते पद मोठे असून नाना पटोले आणि राज्यपाल यांनी काय बोलावे, हे मी सांगू शकत नाही.