२९ ऑगस्टपासून आयआरसीटीसी चालवणार भारत दर्शन विशेष रेल्वे


नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे नवीन ट्रेन सुरू करणार असून २९ ऑगस्टपासून भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ‘भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन्स’ सुरू करणार आहे. हैदराबाद, अहमदाबाद, निष्कलंक महादेव शिव मंदिर, अमृतसर, जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी ठिकाणांचा या टूरमध्ये समावेश आहे. टूर पॅकेजची एकूण किंमत ११,३४० पासून सुरू होते. हा प्रवास २९ ऑगस्टला सुरू होऊन १० सप्टेंबरला संपेल.

या रेल्वेचे बुकिंग कसे करायचे? ही टूर कुठून सुरु होईल आणि पॅकेजमध्ये काय-काय मिळणार? याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. पण तत्पूर्वी पर्यटकांना लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट (प्रवासाच्या तारखेपूर्वी ४८ तासांपेक्षा कमी) सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे.

आयआरसीटीसी टुरिझमच्या माहितीनुसार देशातील सर्व महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश या टूर पॅकेजमध्ये असेल. हे सर्वात किफायतशीर टूर पॅकेजपैकी एक आहे. भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनचे बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.irctc.co.in/ वर ऑनलाइन उपलब्ध आहे. आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे देखील पर्यटकांना बुकिंग करता येईल.

भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनसाठी बोर्डिंग पॉइंट बनवण्यात आले आहेत, जेथून प्रवासी या ट्रेनमध्ये प्रवास सुरू करू शकतील. मदुराई, डिंडीगुल, करूर, इरोड, सेलम, जोलारपेट्टाई, काटपाडी, एमजीआर चेन्नई सेंट्रल, नेल्लोर, विजयवाडा ही स्टेशन आहेत. तर विजयवाडा, नेल्लोर, पेरंबूर, काटपाडी, जोलारपेट्टाई, सालेम, इरोड, करूर, डिंडीगुल, मदुराई ही डी-बोर्डिंग पॉईंट्स आहेत

या टूर पॅकेज अंतर्गत स्लिपर क्लासमध्ये रेल्वे प्रवासाची सुविधा असेल. रात्रीचा मुक्काम / धर्मशाळेत फ्रेश अप / मल्टी शेअरिंग आधार सुविधा असतील. सकाळचा चहा किंवा कॉफी, न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या व्यतिरिक्त दररोज १ लिटर पिण्याचे पाणी पुरवले जाईल. ट्रेनमध्ये टूर एस्कॉर्ट आणि सुरक्षा असेल. यासह, प्रवाशांसाठी प्रवास विमा देखील असेल. तसेच, प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनोच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क घालून सामाजिक अंतर पाळावे लागेल.