शिवसैनिकांच्या तोडफोडीनंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण


मुंबई – शिवसेनेने मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला विरोध करत तोडफोड केली आहे. विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत शिवसैनिकांनी तो तिथून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक तिथे लावले होते. शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला आणि नामफलकाची तोडफोड केली. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सर्व घटनेनंतर अदानी समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आधीच्या कंपनीच्या ठिकाणी आम्ही ब्रॅन्डिंग करत आहोत आणि हे ब्रॅन्डिंग सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन केले जात आहे. कोणताही बदल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावामध्ये करण्यात आलेला नाही किंवा या नावाच्या ब्रॅन्डिंगमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या सर्व गोष्टी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निकषानुसारच केल्या जातात. या ठिकाणी व्यवस्थापनाचे अधिकार असलेली आधीची कंपनी ही जीव्हीके कंपनी होती. जिथे जीव्हीकेचे ब्रॅन्डिंग होते, तिथे अदानी एअरपोर्ट ब्रॅन्डिंग करत असल्याचे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

१३ जुलैला अदानी समूहाकडे मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा देण्यात आल्यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्यामुळे शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजी बोलून दाखवली होती.