सर्पदंश झाल्यास..


सध्या सततच्या पावसाने जमिनीतील बिळांमध्ये एरव्ही दडून राहणारे सर्प आता बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे घरामध्ये, घराच्या आसपास एखादा भला मोठा साप आढळल्याच्या घटना या दिवसांमध्ये वारंवार घडत असतात. अशीच घटना अलीकडे मुंबईमध्ये देखील घडली. एक साप तेहसीम नामक तरुणीच्या घरात शिरला आणि टीव्ही पहात बसलेल्या तेहसीमला चावला. तेहसीमने घाबरून जाऊन मोठ्याने किंकाळी फोडली असता, आतमध्ये कामात मग्न असलेली तिची आई सुलताना धावतच बाहेर आली. सर्पदंशावर ‘अँटी व्हेनम’ दिले जाणे हाच योग्य उपचार असून, ते दिले जाण्यासाठी कोणत्या प्रकारचा साप चावला आहे याची माहिती डॉक्टरांना देणे आवश्यक असल्याची माहिती तेहसीमच्या आईला असल्याने आपल्या मुलीला चावलेला साप पकडण्याचा प्रयत्न तिने केला. तिने साप पकडला, मात्र त्या प्रयत्नांमध्ये सापाने तिलाही दंश केला. त्यानंतर तेहसीम आणि सुलताना दोघी जवळच्या इस्पितळामध्ये गेल्या असता, त्यांना सत्वर सायन हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. सायन हॉस्पिटलमध्ये सुलतानाने पकडून आणलेला साप पाहून तो कोणत्या जातीचा आहे हे समजणे डॉक्टरांना शक्य झाले, आणि त्यानुसार त्वरित अँटी व्हेनम दिले गेल्याने सुलताना आणि तेहसीम या दोघींचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

सर्पदंश झाल्यानंतर नेमके काय करायला हवे हे सुलतानाला माहिती असल्याने तिचे आणि तिच्या मुलीचे प्राण वाचू शकले. मात्र ही माहिती
सर्वसामान्यांना असतेच असे नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने अलीकडेच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाच्या अनुसार भारतामध्ये दरवर्षी सुमारे पन्नास हजार व्यक्ती सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडत असल्याचा खुलासा झाला आहे. सर्पदंश झाल्यानंतर नेमके काय करायला हवे याची अपुरी माहिती, उपचार मिळण्यासाठी लागलेला उशीर, आणि ‘अँटी व्हेनम’ उपलब्ध नसणे, ही या मृत्यूंच्या मागची प्रमुख कारणे आहेत. भारतामध्ये दरवर्षी २.८ मिलियन सर्प दंशाच्या केसेस समोर येत असून, यापैकी नव्वद टक्के केसेसच्या बाबतीत हे सपर्दंश ‘कॉमन क्रेट’, ‘रसेल्स वायपर’, ‘इंडियन कोब्रा’ आणि ‘सॉ स्केल्ड वायपर’ या चार प्रजातींच्या सापांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्पदंश झालाच तर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असल्याने ‘ह्युमेन सोसायटी ऑफ इंडिया’च्या वतीने काही महत्वाच्या सूचना जनहितार्थ जारी करण्यात आल्या आहेत. सोळा जुलै हा दिवस जागतिक सर्प दिन म्हणून साजरा केला जात असून, त्या निमित्ताने सर्पदंश झालाच तर काय करावे हे जाणून घेऊ या.

सर्पदंश झाल्यास शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करावा, आणि ज्या हाताला, किंवा पायाला किंवा शरीराच्या ज्या भागावर सर्पदंश झाला असेल, त्या भागाची जास्त हालचाल करू नये. घाबरून गेल्याने किंवा जास्त हालचाल केल्याने शरीरातील रक्त जास्त वेगाने प्रवाहित होते. त्याद्वारे सर्पाचे विष शरीरामध्ये झपाट्याने पसरण्याचा संभव असतो. ज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल, तो भाग मोकळा करावा. हाताला किंवा पायाला सर्पदंश झाल्यास घड्याळ, बांगड्या, पायमोजे, पैंजण इत्यादी घट्ट होऊ शकणाऱ्या वस्तू काढून टाकाव्यात. सर्पदंश झाल्यानंतर शरीराच्या त्या भागावर सूज येत असते, त्यामुळे या वस्तू काढून टाकणे आवश्यक ठरते. सर्पदंश झाल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयामध्ये नेऊन ‘अँटी व्हेनम’ दिले जाणे आवश्यक असते. रुग्णालयामध्ये नेतानाही सर्पदंश झालेला शरीराचा हिस्सा शक्यतो स्थिर ठेवला जाईल याची दक्षता घ्यावी. रुग्णालयामध्ये नेले जात असताना रुग्णाच्या तब्येतीमध्ये जाणविणारे सर्व फरक नोंदवून घेत त्याची संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्यावी.

सर्पदंश झाल्यानंतर ज्या ठिकाणी साप चावला असेल, त्याच्या आसपास घट्ट कपडा बांधून ठेवणे किंवा पट्टा आवळून ठेवणे असले प्रकार काटेकोरपणे टाळावेत. त्यामुळे त्या ठिकाणचा रक्तप्रवाह थांबून कायमस्वरूपी हानी होऊ शकते. सर्पदंश झाला असता, रुग्णाला चहा, कॉफी पाजणे, पेन किलर्स देणे आवर्जून टाळायला हवे. तसेच जिथे साप चावला असेल, तिथे ब्लेडने किंवा चाकूने चीर देऊन रक्त वाहू देणेही धोकादायक ठरू शकते. अश्यावेळी या जखमेमध्ये ब्लेडमुळे किंवा चाकूमुळे घातक संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे जखम चोखून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, जखमेवर पाणी टाकणे, हे प्रकारही अगत्याने टाळायला हवेत. सर्पदंश झाला असता, सापाला पकडण्याचा, मारण्याचा प्रयत्न करण्यात वेळ न घालवता, रुग्णाला त्वरित रुग्णालयामध्ये नेणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी तंत्र मंत्र करून सापाचे विष उतरविण्याचे प्राणघातक प्रकारही केले जात असतात. सर्पदंश झाला असता, त्यासाठी उपाय हा केवळ ‘अँटी व्हेनम’ दिल्यानेच केला जाऊ शकतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे आजच्या काळामध्ये उपलब्ध असणारे अँटी व्हेनम ‘पॉलिव्हॅलंट’ असल्याने, कॉमन क्रेट, रसेल्स वायपर, इंडियन कोब्रा आणि सॉ स्केल्ड वायपर या चारही सर्पांच्या दंशावर लागू पडणारे आहे. त्यामुळे सर्पदंश झाल्यास, वेळ वाया न घालविता, रुग्णाला त्वरित रुग्णालयामध्ये नेऊन ‘अँटी व्हेनम’ दिले गेल्याने त्याचे प्राण नक्कीच वाचविले जाऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment