ओयमायकॉन – जगातील सर्वात थंड हवामान असलेले ठिकाण


मानवी वस्ती असलेले हे जगातील सर्वात थंड हवामान असलेले गाव म्हणून ओळखले जाते. एका वर्षीच्या हिवाळ्यामध्ये या ठिकाणचे तापमान -७१ अंशांच्याही खाली गेले असून, जानेवारी महिन्यामध्ये येथील तापमान -५० अंशांच्या आसपास रहाते. सायबेरियामध्ये असणारे हे गाव आहे ओयमायकॉन. या गावामध्ये सुमारे पाचशे माणसांची वस्ती आहे. या गावामध्ये एक मोठे हिटिंग प्लांट असून त्यामार्फत सर्व घरांसाठी आवश्यक असे हिटिंग पुरविले जात असते.

प्रत्येक घरामध्ये हिटिंगची व्यवस्था असल्याने घराच्या आतील आणि घराच्या बाहेरील तापमानामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे येथे पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीला घराच्या उबदार वातावरणातून एकदम बाहेर पडताना बाहेरच्या थंडीचा अंदाज येतोच असे नाही. हा हिटिंग प्लांट कोळश्यावर चालणारा असून, ऐन हिवाळ्यामध्ये या गावाला चोवीस तासांतील केवळ साडे चार तास उजेड पहावयास मिळतो. बाकी वेळी या ठिकाणी संपूर्ण अंधारच असतो.

१९२४ साली या ठिकाणी तापमानाचा पारा -७१ अंशांच्या खाली उतरला होता. त्या दिवसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ ओयमायकॉन गावामध्ये एक मोठा स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभाला ‘द पोल ऑफ कोल्ड’ म्हणून संबोधले जाते. या गावामध्ये दैनंदिन गरजांच्या वस्तू उपलब्ध करून देणारे एकमेव दुकान आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये -४५ अंश तापमानामध्येही हे दुकान ग्राहकांच्या सेवेसाठी खुले असते. या गावामध्ये वाहन चालविणे हे मोठे दिव्य आहे.

येथे वाहन चालविताना वाहनामध्ये ‘फ्लेम थ्रोअर’ असणे आवश्यक असते. अतिथंडीमुळे वाहनाचे इंजिन थंड होऊन काम करणे बंद करते. अश्या वेळी फ्लेम थ्रोअरच्या मदतीने गाडीचे इंजिन गरम करून मग वाहन सुरु करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अश्या या गावातील दैनंदिन जीवन येथील रहिवाश्यांसाठी मोठे कठीणच म्हणावे लागेल.

Leave a Comment