बेंगळूरूमधील ही ठिकाणे आहेत झपाटलेली


गार्डन सिटी, सिलिकॉन व्हॅली, इत्यादी नावांनी ओळखले जाणारे, उत्तम हवामान आणि व्यवसायासाठी अनेक उत्तम संधी उपलब्ध करून देणारे शहर, म्हणजे बेंगळूरू. आशिया खंडातील सर्वात जलद गतीने विकसित होत असणाऱ्या शहरांमध्ये बेंगळूरूची गणना केली जाते. मात्र तांत्रिक दृष्ट्या आघाडीवर असणाऱ्या शहरामध्ये काही ठिकाणे अशी आहेत, ज्यांच्याशी निगडित हकीकतींच्या मुळे ही ठिकाणे ‘झपाटलेली’ असल्याचे म्हटले जाऊ लागले. आता या हकीकतींची सत्यासत्यता कोणी अधिकृत रित्या पडताळून पाहिली नसली, तरी ही ठिकाणे झपाटलेली आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी अनेक हौशी मंडळी या ठिकाणांना भेटी देण्यास नेहमीच उत्सुक असतात.

बेंगळूरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ झपाटलेला असल्याचे अनेक किस्से येथे नेहमी सांगितले जात असतात. दिवसाचे चोवीस तास इतके व्यस्त असणारे ठिकाण झपाटलेले कसे काय असू शकते हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, मात्र २००८ सालापासून पांढरी साडी परिधान केलेली एक स्त्री धावपट्टीवर दिसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर विमानतळावरील कार्गो लोडिंग विभागामध्येही ही स्त्री अनेक कर्मचाऱ्यांनी पाहिली असल्याचे सांगितले आहे. इन्फ्रा रेड कॅमेरामधेय स्त्रीची आकृती स्पष्ट दिसली असल्याचे म्हटले जात असून, विमानतळापासून नियमित टॅक्सी सेवा पुरविणारे वाहनचालक देखील या स्त्रीचे दर्शन झाले असल्याचे म्हणतात. ही स्त्री बेहुतेकवेळी काही क्षणांपुरतीच दृष्टीस पडते आणि त्यानंतर कुठे गायब होऊन जाते हे आजतागायत न उलगडलेले रहस्य आहे. ‘सेंट जॉन्स सेमीटरी’ या ठिकाणी आपल्या आप्तांच्या, परिचितांच्या अंत्यविधीसाठी किंवा त्यांच्या समाधींचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या अनेकांना या दफनभूमीमध्ये चित्रविचित्र अनुभव आल्याचे म्हटले जाते. काहींनी येथे एका वृद्ध इसमाला पाहिल्याचे म्हटले आहे, तर इतरांनी देखील असेच अनुभव घेतले आहेत. या सर्व हकीकतींमुळे हे ठिकाण झपाटलेले समजले जात असून, सूर्यास्तानंतर येथील चौकीदारही येथे थांबत नाहीत.

बंगळूरू शहरात आजही उभे असलेले व्हिक्टोरिया हॉस्पिटल सुमारे शंभर वर्षे जुने आहे. या ठिकाणी देखील अनेक चित्रविचित्र घटना घडल्याचे ऐकण्यास मिळत असते. येथे असणारे एक भूत ‘उपाशी’ असल्याचे म्हटले जाते, कारण रुग्णांना भेटावयास येणाऱ्या परिजनांनी आणलेले खाऊचे पदार्थ येथे नेहमीच गायब होत असतात. हे पदार्थ कोण नेते, कधी नेते हे आजवर समजू शकलेले नाही. या शिवाय येथील चौकीदारांनी रात्रीच्या वेळात एका स्त्रीची आकृती इस्पितळाच्या परिसरामध्ये वावरताना पाहिली आहे. केवळ खाऊचे पदार्थ कोणाला काही कळायच्या आत गायब करणाऱ्या या तथाकथित ‘खवय्या’ भुतांनी आजवर कधी कोणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचविल्याचे मात्र ऐकिवात नाही. सेंट मार्क्स रोडवर असलेले ‘टेरा व्हेरा’ नामक एक आलिशान बंगलाही झपाटलेला असल्याचे म्हटले जाते. या बंगला व्हेरा वाझ आणि डोल्चे वाझ या दोघी बहिणींच्या मालकीचा असून, २००२ साली डोल्चे वाझची याच बंगल्यामध्ये अनोळखी व्यक्तींकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही काळाने व्हेरा वाझ देखील हा बंगला सोडून निघून गेल्या. तेव्हापासून हा बंगला ओस पडला असून, आता या बंगल्याची पुष्कळ पडझड झाली आहे. तरीही या ठिकाणी अनेक विचित्र घटना अनुभवायला मिळाल्याचे अनेक जण म्हणतात.

Leave a Comment