राणी एलिझाबेथ दररोज असा निवडतात आपला पोशाख.


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दररोज अनेक सार्वजनिक समारंभांना उपस्थित राहत असतात. कधी कुठल्या संस्थांची उद्घाटने, कधी कुठल्या ठिकाणी द्यावयाची औपचारिक भेट, तर कधी राणी एलिझाबेथ यांची भेट घेण्यासाठी आलेले पाहुणे किंवा इतर देशांचे प्रतिनिधी, अश्या प्रकारच्या अनेक कार्यक्रमांमध्ये राणी एलिझाबेथ दररोज व्यस्त असतात. त्यामुळे दर दिवशी त्या परिधान करणार असलेला पोशाख, आभूषणे यांची सिद्धता आधीपासूनच, आणि अर्थातच राणी एलिझाबेथ यांच्या परवानगीने केली जात असते. मात्र दररोजच्या कार्यक्रमांसाठी पोशाखाची निवड करायची झाल्यास, राणी एलिझाबेथ आपल्या कपाटांमध्ये ठेवलेल्या पोशाखांतून एखादा पोशाख निवडत असतील, ही समजूत मात्र अगदी चुकीची आहे.

वास्तविक राणी एलिझाबेथ आपल्या पोशाखाची निवड त्या पोषाखाचे ‘स्केच’ पाहून करतात. राणी एलिझाबेथ यांचे कुठलेही पोशाख त्यांच्या खासगी कक्षामध्ये न ठेवले जाता, सर्वात वरच्या मजल्यावर असणाऱ्या मोठ्या ‘क्लोसेट’ मध्ये ठेवले जात असतात. त्यामुळे राणीच्या पोशाखाची निवड करण्यासाठी राणी या क्लोसेटमध्ये न जाता, त्यांनी घालावयाच्या पोशाखाची स्केचेस त्यांना दाखविली जातात. एका वेळी तीन ते चार निरनिराळ्या पोशाखांची स्केचेस राणी एलिझाबेथ यांना दाखविली जात असून, ज्या कपड्यापासून हे पोशाख तयार करण्यात आले आहेत, त्या कपड्याचे तुकडेही या स्केचला जोडलेले असतात. त्यावरून सदर पोशाख कुठल्या पद्धतीने बनविला गेला आहे, आणि तो पोशाख बनविण्यासाठी वापरले गेलेले कापड रेशमी आहे, सुती आहे, की वुलन आहे, हे राणी एलिझाबेथ यांच्या लक्षात येते. या तीन ते चार स्केचेस पैकी ज्या स्केचची निवड राणी एलिझाबेथ करतात, तो पोशाख त्यांच्या खासगी सेविका क्लोसेटमधून घेऊन येत असतात. सेविकेने आणलेला पोशाख राणी एलिझाबेथ स्वतः पाहतात आणि मगच त्या दिवशीचा पोशाख कोणता असणार आहे याची निश्चिती करता येते.

राणी एलीझाबेथ यांनी वयाची ९३ वर्षे नुकतीच पूर्ण केली असून, गडद रंगाचे पोशाख करण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. याचा अर्थ राणी एलिझाबेथ यांना गडद रंग आवडतात असा मात्र नाही. राणी एलिझाबेथ यांच्या पोशाखांचे रंग गडद आणि काहीसे हटके असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्या कुठे उभ्या आहेत हे नागरिकांना सहज लक्षात यावे यासाठी राणी एलिझाबेथ यांच्या पोशाखांचे रंग लोकांच्या सहज नजरेत भरतील असे असतात. एखादा पोशाख जुना झाल्यास तो पोशाख राणी एलिझाबेथ त्यांच्या ड्रेसर्सना देऊ करतात. त्यानंतर हा पोशाख स्वतः परिधान करायचा की त्याची विक्री करायची हा निर्णय ड्रेसरचा असतो. राणी एलिझाबेथ आधुनिक फॅशनचे अंधानुकरण करणाऱ्या नसून, त्यांचे पोशाख सध्याची फॅशन ट्रेंड आणि राणी एलिझाबेथ यांची पसंती दोन्ही लक्षात घेऊन बनविले जात असतात.

Leave a Comment