वेळ पडल्यास शिवसेना भवन देखील फोडू, असे वक्तव्य करणाऱ्या प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी


मुंबई – शिवसेना भवनासंदर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेले वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत सगळे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. असे कोणतंही वक्तव्य आपण केलेले नसून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे प्रसाद लाड म्हणाले आहेत. यासंदर्भातील त्यांचे वक्तव्य शनिवारी रात्री व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. यावर रात्री उशिरा प्रसाद लाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, आपल्या वक्तव्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे देखील ते म्हणाले आहेत.

रात्री उशिरा आपल्या फेसबुक अकाउंटवरून याविषयीचे स्पष्टीकरण भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहे. माझ्या एका भाषणाचा प्रसारमाध्यमांतून विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. पण मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल. पण ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असे कोणतेही वक्तव्य केले जाणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आपल्याला नेमके काय म्हणायचे होते, याबाबत प्रसाद लाड यांनी दावा केला आहे. माझे असे म्हणणे होते की जेव्हा आम्ही माहीममध्ये येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या बातमीचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आले आहे, त्यावर माझे हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नसल्याचे प्रसाद लाड यांनी नमूद केले आहे.

प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. जर मी कुणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले आहेत. पण, यासोबतच, आपल्या व्हिडीओमध्ये घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले, जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.