आज रात्रीपर्यंत जाहीर होऊ शकते ब्रेक द चेनची नवीन नियमावली


मुंबई : आज रात्रीपर्यंत ब्रेक द चेनची नवीन नियमावली जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य विभागाने दोन दिवसापूर्वी टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवली होती. यावर मुख्यमंत्री निर्णय घेऊन आज निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. यामध्ये 11 जिल्हे सोडले तर उर्वरित 25 जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

यासोबत मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल केले जाणार आहेत. पण पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यामुळे नवीन नियमावली कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मराठवाड्यातील परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद तर विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम तर कोकणातील ठाणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये निर्बंध कायम राहतील.

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. या 11 जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजून निवळलेली नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार असल्याचे टोपे यांनी काल सांगितले.

तसेच राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे नेट सरासरी पेक्षा अधिक असल्यामुळे तेथील कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाही. पण, इतर जिल्ह्यात जे निर्बंध लेव्हल 3 चे आहेत. त्यांच्यासंदर्भात आरोग्य विभागामार्फत सूचना मुख्यमंत्र्याना केल्या आहेत. जगात अनेक देशात तिसरी लाट सुरु आहे. लसीकरण झाले असल्यामुळे मृत्यूदर कमी आहे. लसीकरण वेगाने होत आहे. अर्थचक्रही चालले पाहिजे त्यामुळे निर्बंध शिथील होतील.