कोरोनाचा ‘सुपर म्युटंट’ माजवणार हाहाकार; ब्रिटीश वैज्ञानिकांचा इशारा


ब्रिटन : जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ झाला, तरीही कोरोनाचा प्रकोप काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका आता सर्वांना धडकी भरवत असताना सुपर म्युटंट हाहाकार माजवू शकतो, असा इशारा वैज्ञानिकांकडून देण्यात आला आहे.

कोरोनाचा नवा व्हॅरिएंट एवढा घातक असेल की, त्यामुळे दर तीनपैकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू ओढावू शकतो. परिणामी या नव्या व्हायरसमुळे मृत्यूदर 35 टक्क्यांवर पोहोचू शकतो, असे निरीक्षण ब्रिटन सरकारच्या साइंटिफिक अडवाइजरी ग्रुप फॉर इमर्जेंसीजने (SAGE) नोंदवले आहे.

एखादा व्हायरस अथवा विषाणू प्रदीर्घ काळासाठी राहिल्यास त्याच्या म्युटेशनचा धोका संभवतो. ब्रिटनमध्ये असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार हिवाळा सुरु होण्यापूर्वी ब्रिटनमध्ये बूस्टर व्हॅक्सिन आणणे गरजेचे असेल. शिवाय परदेशातून येणाऱ्या व्हायरसच्या नव्या व्हॅरिएंटला रोखण्यासोबतच काही जनावरांनाही मारावे लागू शकते, ज्यांच्यामध्ये हा व्हायरस राहू शकतो.

वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार सुपर म्युटंट अतिशय धोकादायक ठरु शकतो. नवा व्हॅरिएंट बीटा, अल्फा आणि डेल्टा यांच्या मिश्रणातून तयार झालेला असल्यास तो लसींचा प्रभावही कमी करू शकतो, ज्यामुळे मृत्यूदरात वाढ होण्याची भीती आहे. काही वैज्ञानिकांच्या मते लसीचा प्रभाव कमी करण्यासाठी व्हायरसही तितकाच प्रभावी असावा लागतो.

एकीकडे ब्रिटन सरकार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याच्या तयारीत असतानाच वैज्ञानिकांनी त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अद्यापही कोरोनाचा धोका कमी झाला नसल्यामुळे सरकारने अधिक सतर्क रहावे, असेच वैज्ञानिकांचे मत आहे. शिवाय काही औषधांचा वापर बेतानेच करण्यात यावा असा, इशाराही डॉक्टरांना वैज्ञानिकांनी दिला आहे.