सावधान! राज्यातील तब्बल 644 गृहप्रकल्प काळ्या यादीत


मुंबई : आपल्या प्रत्येकाचे आपले स्वत:चे हक्काचं घर असावे, असे स्वप्न असते. त्याचबरोबर आपल्या बजेटमध्ये आणि स्वस्तात घर मिळावे असे आपल्यापैकी अनेकजणांना वाटत असते. कर्ज काढत किंवा आयुष्यभर साठवलेली पुंजी वापरत सामान्य माणूस घराचे स्वप्न पूर्ण करत असतो. पण घराचे व्यवहार करताना काळजीपूर्वक आणि पूर्ण चौकशी करुनच करा. कारण तूमची फसवणूक होऊ शकते.

राज्यभरातील 644 गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने (Maharashtra Housing Regulatory Authority) काळ्या यादीत (Blacklists) टाकले आहे. या प्रकल्पांना होत असलेल्या विलंबामुळे बांधकाम व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी महारेराने हे पाऊल उचलले आहे. या 644 गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी आणि सांगलीमधील प्रकल्पांचा समावेश आहे.

या गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने घरांची विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा त्यांच्या प्रकल्पाचे प्रमोशन करण्यास मनाई केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गृहनिर्माण प्रकल्पांमधील जवळपास 80 टक्के फ्लॅट आधीच विकले गेले आहेत.

महारेरा’ने काळ्या यादीत टाकलेले प्रकल्प पूर्ण होण्यास बराच विलंब लागत आहे. दिलेली तारीख उलटून अनेक वर्ष झाल्यानंतरही ग्राहकांना घरांचा ताबा मिळालेला नाही. 644 पैकी 16 प्रकल्प हे 2017 सालीच पूर्ण होणे अपेक्षित होते. तर 84 टक्के प्रकल्प 2018 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, बांधकाम व्यावसायिकांनी चालढकल केल्यामुळे अद्यापही ग्राहकांना घराचा ताबा मिळालेला नाही. 644 पैकी 274 गृहप्रकल्प मुंबईतील आहेत, तर 189 प्रकल्प पुण्यातील आहेत. 181 प्रकल्प उर्वरीत राज्यात आहेत.