करोना लस घेतल्याने राहुल गांधींची दोन दिवस सुट्टी

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला असल्याचे आणि त्यामुळे गुरुवार शुक्रवार असे दोन दिवस ते संसदेच्या पावसाळी अधिवेशन सत्राला गैरहजर राहिल्याचे कॉंग्रेस कडून सांगण्यात आले आहे. देशात करोनाची दुसरी लाट अद्यापी संपलेली नाही त्यामुळे सर्व जनतेप्रमाणे राजकीय नेत्यांनीही लसीकरण करून घ्यावे असा सल्ला सरकारने दिला होता मात्र भारतात तयार झालेल्या लसीबाबत विरोधकांनी सुरक्षा संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे तसेच प्रियांका गांधी यांनी कोविड लसीचा एक डोस घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र गांधी परिवाराने कोणती लस घेतली याचा खुलासा केला गेलेला नाही.

४५ वयोगटावरील व्यक्तींचे कोविड १९ लसीकरण सुरु होऊन बरेच दिवस झाले असले तरी राहुल गांधी यांचा करोना रिपोर्ट २० एप्रिल रोजी पोझिटिव्ह आल्याने त्यांनी उशिरा लस घेतली असे समजते. प्रियांका गांधी यांनी मे मध्ये लस घेतली आहे. दरम्यान कोविड १९ ची भारतात तयार झालेली लस भाजप लस असल्याचे घेणार नाही अशी घोषणा केलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही लस घेतल्याचे समजते.

देशात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरण वाढवावे असे आदेश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत. निराश्रित, बेघर, भिकारी यांना स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने लस दिली जावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत.