पुणे – लाखो पुणेकरांना मेट्रो कधी सुरु होणार हा प्रश्न पडला होता, त्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले. कारण आज या बहुप्रतिक्षीत मेट्रोची ट्रायल रन पार पडली. बहुप्रतिक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. पुणे मेट्रोला उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेअंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात मेट्रोची चाचणी झाली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे 3.5 किलोमीटर अंतरात ही चाचणी पार पडली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्व द्यायचे असते. ही काम सुरु असताना पुणेकरांनी संयम दाखवला, त्याबद्दल पुणेकरांचे आभार मानतो.
पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन, अजित पवारांनी दाखवला हिरवा झेंडा
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले.@Info_Pune @MahaDGIPR pic.twitter.com/RbSPttlsAB
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) July 30, 2021
नुकतीच मुख्यमंत्र्यांनी पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला मान्यता दिली. पुण्याचा विकासाच आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये निगडी ते दापोडी प्रवास सुरु करु शकतो. पुण्याला सर्वोत्तम शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, दोन रिंग रोड, 10 मेट्रो मार्गिका यांचा प्रामुख्याने समावेश आहे. टप्प्याटप्याने पुढे जाणार आहोत. या सगळ्या कामाला 75 कोटी रुपये लागतात. शरद पवार कायम सांगत आले आहेत, कोणत्याही गोष्टीचा विचार करताना कमीतकमी 25 तर जास्तीतजास्त 50 वर्षाचा विचार करुन करत जा. पुढची 50 वर्ष डोळे समोर निर्णय घेतो. ही सगळी काम करताना राजकारण न करता करण्याचा आमचा मानस असल्याचेही अजित पवार म्हणाले.