
मुंबई – पश्चिम महाराष्ट्रासह कोकणालाही मुसळधार पावसामुळे पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागांचा दौरा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे. अद्याप कोणतीही मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेली नसून लवकरच ती जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
ठाकरे सरकारचे पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचे आदेश
पत्रकार परिषदेत नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागात वीजवसुली करु नये असे आदेश आम्ही दिले आहेत. या ठिकाणी वसुली होणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत वीजबिलेदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार समिती करत आहे. दरम्यान नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचे स्पष्ट केले.
