मराठी अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यास सांगणाऱ्या उत्तर प्रदेशच्या चौघांना मनसैनिकांनी धुतले


ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर येथे मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो, असे सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना चांगलाच चोप दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा उत्तर प्रदेशमधील या तरुणांनी प्रयत्न केल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना रंगेहाथ पकडले आणि चोप दिल्यानंतर त्यांनी या चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये एक जण हा शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

आपल्या फेसबुक पेजवरुन काही व्हिडीओ अमेय खोपकर यांनी शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये खोपकर यांनी संपूर्ण प्रकार काय आहे याची माहिती दिली. एका मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना फोन करुन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली होती.

या अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार तिला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका देण्यात आल्याचे सांगितले. पण हा रोल हवा असेल तर उद्या या चित्रपटाचे निर्माते उत्तर प्रदेश लखनऊमधून मुंबईत येणार आहेत. तर तुला त्यांना खूष करावे लागेल, तुला कॉम्प्रमाइज करावे लागेल. असे केले, तरच तुला त्या मोठ्या चित्रपटात रोल दिला जाईल, असे या अभिनेत्रीला सांगण्यात आल्याचे खोपकर म्हणाले. या अभिनेत्रीने घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळे सांगितले. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना याबाबत कळवल्यानंतर या लोकांना ट्रॅप करुन ताबडतोब पोलिसांच्या हवाली करण्यास सांगितले.

जेव्हा ही मुलगी घोडबंदर रोड येथील एका फार्म हाऊसवर गेली, तेव्हा मनसेचे पदाधिकारीही तेथे पोहचले. मनसे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला. या चौघांकडे देशी कट्टेपण सापडले आहेत. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चौघांची नाव असल्याचे खोपकर यांनी सांगितले.

यासंदर्भातील माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांनी दिली आहे. एका मराठी मुलीला तिवारी आणि यादव नावाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटांमध्ये काम देतो असे सांगून फसवले. या दोघांसाठी कास्टींगचे काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी या मुलीला तुला निर्मांना खूष करावे लागेल असे सांगितल्यानंतर या मुलीला फोन करुन सांगण्यात आले की तुला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये यायचे आहे, जिथे आम्हा दोघांबरोबरच आमचा एक मित्रही असेल. आमचा मित्र लखनऊवरुन येणार असून तुला रात्रभर त्या हॉटेलमध्ये आम्हा तिघांसोबत थांबावे लागेल, असे या मुलीला सांगण्यात आले.
https://fb.watch/73zOvNM4LP/
यासंदर्भात अमेय खोपकर यांना माहिती दिली असता त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना या लोकांना तुडवण्यास सांगितल्याची माहिती राणे यांनी दिली. ही अशी माणसे उत्तर प्रदेश, बिहारमधून येतात आणि आपल्या मुलींना खराब करण्यासाठी त्यांना नको नको त्या चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले जाते. पण या मुलीची दाद दिली पाहिजे कारण तिने यांच्याविरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला. हे असे नराधम लोकांसमोर आले पाहिजेत. आज मी आवाज नाही उठवला, तर हे लोक अशा किती महिलांवर आत्याचार करतील सांगता येत नाही. तिच्या या एका आवाजासाठी आम्ही येथे एकत्र येऊन या लोकांना चोप दिल्याची माहिती राणे यांनी दिली आहे. सध्या या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.