बच्चू कडूंचे डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुंबईतील Apeejay शाळेच्या चौकशीचे आदेश


नवी मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे नेरूळ येथील Apeejay स्कूलच्या प्राचार्य आणि संस्था चालक यांनी पालकाकडून शाळा प्रवेशासाठी 1,22,201 रुपयांचा डीडी आणि 6457 रुपये ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी केली असून, या तक्रारीनुसार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act 1987 अंतर्गत अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा आहे. पालक अजय तापकीर यांनी त्याची मुलगी कथा तापकीर हिच्या शाळा प्रवेशावेळी दिलेला डीडी आणि ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून जोडला आहे.

The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act 1987 अंतर्गत Apeejay स्कूल नेरूळमधील प्राचार्य आणि संस्था चालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पालकांचे पैसे परत देण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी केली.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारला दिलेल्या निकषांप्रमाणे महाराष्ट्रातही खासगी शाळांची फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी शाळांची फी 85 टक्के भरावी, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले होते. पालकांना मोठ्या प्रमाणात आशा होती, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल, असे त्या म्हणाल्या होत्या.