संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त ‘केजीएफ 2’चे नवे पोस्टर रिलीज


बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ अर्थात संजय दत्त आज आपला ६२ वाढदिवस साजरा करत आहे. संजू बाबाने यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांसाठी अनोखे गिफ्ट दिले आहे. ‘केजीएफ २’ या बहूचर्चित चित्रपटात संजय दत्तच्या ‘अधीरा’ या भूमिकेबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवे पोस्टर संजय दत्तने रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त खूप भयानक रुपात दिसत आहे. संजय दत्त साकारत असलेल्या ‘अधीरा’च्या लुकचे यापूर्वी सुद्धा अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. त्यानंतर संजय दत्तने आज हे नवे पोस्टर रिलीज केले आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर संजय दत्तने रिलीज केले आहे. या पोस्टरमधील संजय दत्तचा भयानक लुक पाहून ‘केजीएफ २’साठी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजय दत्तने या पोस्टरमध्ये त्याच्या हातात तलवार पकडलेली दिसत असून त्याच्या मागे लोकांचा समुह दिसून येत आहे. संजय दत्तने हे पोस्टर शेअर करताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. तसेच ‘केजीएफ २’ मध्ये काम करतानाचा एक वेगळा अनुभव मिळाल्याचे देखील सांगितले आहे.


संजय दत्तने हे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत एक नवी अपडेट सुद्धा दिली आहे. यात त्याने लिहिले आहे, मला माहित आहे तुम्ही भरपूर दिवसांपासून या चित्रपटाच्या रिलीजसाठी प्रतिक्षा करत आहात… मी तुम्हाला विश्वास देतो की हा चित्रपट तुमच्या सर्वांच्या प्रतिक्षेच्या लायक असेल. साउथ सुपरस्टार यश स्टारर ‘केजीएफ २’ १६ जुलै रोजी रिलीज करण्याचा निर्णय दिग्दर्शक प्रशांत नील यांनी घेतला होता. परंतू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण त्यानंतर दुसरी रिलीज डेट कोणती असणार आहे, हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.