हवामान विभागाने महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा!


मुंबई – यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. पण तरीही सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण हवामान विभागाने आता राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या कोल्हापुरात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यांत हाहाकार उडाला. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.