चिपळूण – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे सध्या पूरग्रस्त चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान स्थानिकांनी त्यांना धारेवर धरले. पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केले?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यांचे संतप्त प्रश्न ऐकून घेतले आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.
पूरग्रस्त चिपळूणकरांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धरले धारेवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हा पाहणी दौरा नाही हा मदत दौरा आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि सेवाभावी संस्थानी बचाव कार्यामध्ये खूप काम केले आहे. अजूनही काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे. पण पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मदत सुरु करण्यात आल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ही वेळ राजकारण बाजूला ठेवायची आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठी काम करत आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्यांना सर्वोतोपरी मदत मिळेल. सध्या आरोग्य तपासणी, घरगुती सामान आणि स्थलांतर या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.