‘या’ दिवशी परीक्षा होणार पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीची परीक्षा


पुणे: राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा आता 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा 8 ऑगस्टला होत असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकली होती.

दरवर्षी फेब्रुवारीमध्ये राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती, ती आता 9 ऑगस्टला होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. पण, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागाने 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. पण, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता परीक्षा लांबणीवर टाकली होती.