आदिवासी बांधवांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:सह समाजाची प्रगती साधावी – बाळासाहेब थोरात


शिर्डी :- तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या व कुटुंबाच्या विकासासाठी संगमनेर तालुक्यात सातत्याने काम होत असून यशोधन कार्यालयामार्फत यासाठी पाठपुरावा केला जात आहे. आदिवासी व गोरगरीब माणसांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेऊन या बांधवांनी स्वत:ची, कुटुंबाची व समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून सरकारच्या माध्यमातून आपण सातत्याने गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे आदिवासी विकास विभागाच्यावतीने अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी योजना 2020-21 अंतर्गत अन्नधान्य व किराणा किट वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. यामुळे सर्वांना समतेचा अधिकार मिळाला आहे. स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गोरगरिबांच्या विकासासाठी खूप मोठे काम केले असून त्यानंतर प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले. शासन कायम गोरगरिबांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आपण संगमनेर तालुक्यात अविरतपणे गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे.

शासनाच्या अनेक विविध योजना असून त्या योजनांचा योग्य लाभ घेऊन आदिवासी बांधवांनी आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी. मुलांना चांगले शिक्षण द्या, व्यसनांपासून दूर रहा, आदिवासींसाठी विविध विभागात राखीव पदे आहेत. त्यामध्ये या मुलांना नोकरीची संधी मिळू शकते. संगमनेर तालुक्यात गोरगरिबांच्या विकासासाठी यशोधनमार्फत सातत्याने काम केले जात आहे. प्रत्येक आदिवासी वाडी-वस्तीवर रस्ते, पाणी, आरोग्यासाठी चांगली व्यवस्था, चांगली शाळा यासाठी काम झाले आहे. संगमनेर विकासाचा हा पॅटर्न विकासाचा पॅटर्न ठरला आहे.

विविध आदिवासी शाळांमधून गुणवंत विद्यार्थी निर्माण झाले आहेत. कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेने आपल्या गुणवत्तेमुळे राज्यात लौकिक निर्माण केला आहे. कोरोना संकटात गोरगरीब आदिवासी बांधवांना मदत मिळावी याकरता मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी अत्यंत चांगली योजना राबवली आहे. खावटी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे दहा लाख आदिवासी बांधवांना याचा लाभ मिळाला असून दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांचा अन्नधान्य किराणा वाटप या योजनेद्वारे केला जात आहे. यापुढील काळातही विविध योजनांचा लाभ घेऊन सर्वांनी आपल्या जीवनात प्रगती साधा असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्‍यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. राज्‍याच्या जबाबदारीबरोबर संगमनेर तालुक्याचे पालक म्हणून त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. राज्‍यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना पोहोचविल्या आहेत. आपल्या तालुक्यातील गोरगरीब बांधवांना सातत्याने मदत मिळाली पाहिजे यासाठी यशोधनच्यावतीने त्यांनी गणनिहाय अठरा जनसेवकांची नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत विविध कामे तातडीने सोडवली जात आहे. हा संगमनेर पॅटर्न राज्याला दिशादर्शक ठरला असल्याचे ते म्हणाले.